

success story Robot Teacher
बुलंदशहर: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका सरकारी शाळेतील १२वीच्या विद्यार्थ्याने आपल्या अलौकिक कल्पकतेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. अवघ्या १७ वर्षांच्या या विद्यार्थ्याने रोबोटिक्सचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता 'रोबोट शिक्षक' तयार केला आहे.
आदित्य नावाच्या या विद्यार्थ्याने 'सोफिया' नावाचा रोबोट बनवला आहे. त्याच्या या रोबोटची शाळेत, जिल्ह्यात आणि आता इंटरनेटवरही मोठी चर्चा सुरू आहे. आदित्यला विश्वास आहे की त्याचा हा शोध ग्रामीण भारतातील शिक्षणाचे चित्र बदलू शकतो.
कॉलेजची वेळ संपल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जात होते, आदित्य मात्र शाळेत थांबून विविध प्रयोगांमध्ये मग्न असायचा. त्याने स्वयं-शिकलेल्या कौशल्यांच्या बळावर रोबोट्स बनवण्याचा छंद जोपासला. आदित्यची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सामान्य आहे. त्याचे वडील कंपाऊंडर म्हणून काम करतात. रोबोट तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामानासाठी त्यांने मित्रांकडून पैसे उधार घेतले आहेत. आर्थिक अडचणींवर मात करत कुटुंबाने त्याच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. आदित्यला प्रेरणा मिळाली ती त्याच्या लहानपणी काकांना छोटे रोबोट बनवताना पाहून. त्यानंतर त्याने भंगार साहित्य आणि टाकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरून स्वतःहून हे कौशल्य शिकले.
आदित्यने बनवलेला सोफिया हा रोबोट अगदी खऱ्या शिक्षकाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवतो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो. रोबोट बनवण्यामागची कल्पना सांगताना आदित्य म्हणाला, “कधीकधी शिक्षक वर्गात येऊ शकत नाहीत आणि मुलांचा तो तास वाया जातो. मला ही समस्या सोडवायची होती.” त्याच्या मते, हा रोबोटिक शिक्षक विशेषतः ग्रामीण शाळांना मदत करू शकतो, जिथे अनेक विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानाशी मर्यादित संपर्क असतो.
सरकारने प्रत्येक जिल्ह्यात नवकल्पना प्रयोगशाळा स्थापन कराव्यात, जेणेकरून मुलांना प्रयोग करण्यासाठी आवश्यक आधार मिळेल. त्याने सांगितले की रोबोटिक्सपेक्षा त्याचे स्वप्न मोठे आहे. अंतराळवीर होण्याचे त्याचे स्वप्न आहे. एका साध्या घरातून, उधार घेतलेल्या पैशातून रोबोट शिक्षक बनवण्यापर्यंतचा आदित्यचा प्रवास प्रोत्साहन देणारा आहे.