

Success Story:
फरीदाबाद: हरियाणातील फरीदाबादचे हिमांशु अदलखा आणि निकिता विवाहबंधनात अडकताच जणू त्यांच्या नशिब बदलले. नवविवाहित निकिताने पती हिमांशुसोबत व्यवसाय सुरू केला आणि पाहता पाहता या व्यवसायाने कधी करोडो रूपये मिळवले, हे समजलेच नाही. खरं तर, हिमांशु आणि निकिता दोघेही व्यावसायिक पार्श्वभूमीतून आले असून त्यांना स्टार्टअपचा चांगला अनुभव आहे. त्यामुळेच दोघांनीही वेळ न घालवता स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
'द वीकेंड लीडर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, निकिताने २०२१ मध्ये इंस्टाग्राम पेजवर 'हेअर ट्रिमर' विकण्यास सुरुवात केली. 'विन्स्टन इंडिया' या ब्रँड अंतर्गत त्यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची प्रसिद्धी केली. तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्यांचा हा ब्रँड चमकू लागला आणि त्यांनी ११ कोटी रुपयांच्या टर्नओव्हरचा टप्पा ओलांडला आहे. आज हा ब्रँड कॅलस रिमूव्हर, हेड मसाजर, एलईडी मास्क आणि कंगवा यांसारख्या उत्पादनांचीही विक्री करत आहे.
हिमांशुने एमबीए पूर्ण केल्यानंतर २-३ स्टार्टअप्स सुरू केले होते, परंतु त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर हिमांशुचे निकितासोबत लग्न झाले आणि या जोडप्याने पुन्हा एकदा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. हिमांशु आणि निकिताने फरीदाबादमधून 'विन्स्टन इंडिया'ची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला ते चीनमधून उत्पादने आयात करायचे आणि भारतात स्वतःच्या ब्रँडिंगसह सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या मदतीने ती विकायचे. जे लोक सलूनमध्ये खूप वेळ आणि पैसे खर्च करतात, त्यांना दर्जेदार आणि विश्वासार्ह 'पर्सनल केअर' उत्पादने उपलब्ध करून देणे, हे या जोडप्याचे मुख्य उद्दिष्ट होते.
रिपोर्टनुसार, हिमांशु आणि निकिता यांनी ३० लाख रुपयांच्या सुरुवातीच्या भांडवलातून आपला व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला त्यांनी मार्केटिंगवर कमी खर्च करून सर्व लक्ष माल साठवणुकीवर केंद्रित केले. त्यांचे पहिले उत्पादन 'ट्रिमर' होते. कोणतीही वेबसाइट नसताना त्यांनी केवळ इंस्टाग्रामच्या माध्यमातून ट्रिमरचे ५००० युनिट्स विकले. ८-१० इन्फ्लुएन्सर्सच्या मदतीने हा सर्व स्टॉक अवघ्या एका आठवड्यात संपला, जे त्यांच्या अपेक्षेबाहेर होते. पहिल्या वर्षी (२०२१-२२), त्याची उलाढाल ६० लाखांवर पोहोचली. पुढच्या वर्षी, ती वाढून ५.५ कोटी झाली. नंतर, ती ११.५ कोटींपेक्षा जास्त झाली.