Delhi Pune SpiceJet flight
नवी दिल्ली: दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. प्रवासी विमानात बसल्यानंतर विमानातील तापमान अचानक वाढले. त्यामुळे वयोवृद्धांसह सर्व प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अशा परिस्थितीतही वैमानिकाला विमानाचे उड्डाण करण्याची घाई झाली होती. मात्र, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि विरोधामुळे विमानात बिघाड झाल्याचे समोर आले. त्यानंतर प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
लेशपाल जवळगे या प्रवाशाने सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानामध्ये आबालवृद्ध प्रवासी होते. विमानाचे तापमान एवढे वाढले की ते प्रवाशांना असह्य झाले. सगळे जण घामाने ओलेचिंब झाले होते आणि त्यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. तशाच स्थितीत विमान धावपट्टीवर घेण्यात आले.
सर्व प्रवाशांनी आरडाओरडा करून विमानाचे उड्डाण करण्यास विरोध दर्शवला. मात्र, वैमानिक आणि कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत प्रवाशांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला आणि धमकावलेसुद्धा. त्यानंतर खरोखरच विमानात बिघाड असल्याचे लक्षात आले.
अशा प्रकारची अत्यंत दर्जाहीन सेवा देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचे काम स्पाइसजेट करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या प्रकाराला कंटाळून प्रवाशांनी विमानतळावरच ठिय्या आंदोलन केले. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन स्पाइसजेट कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.