

Pan Masala Plastic ban
नवी दिल्ली: देशभरात विक्री होणाऱ्या पानमसाल्याच्या प्लास्टिक पॅकेजिंगवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) पूर्णपणे बंदी घातली आहे. आता पानमसाल्याच्या पॅकिंगसाठी प्लास्टिक, ॲल्युमिनियम फॉइल किंवा मेटलाइज्ड लेयर्स (धातूचा लेप असलेल्या पट्ट्या) वापरता येणार नाहीत. यापुढे पानमसाल्यासाठी केवळ प्लास्टिकमुक्त कागद, काच आणि पत्र्यांचे डबे वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
केन्द्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या 'एफएसएसएआय'ने १० ऑगस्ट रोजी यासंदर्भातील 'अन्न सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग) सुधारित नियमावली, २०२६' ची गॅझेट अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सुधारित नियमांनुसार पानमसाल्याचा समावेश अनुसूची ४ मध्ये करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार कागद, पेपरबोर्ड किंवा नैसर्गिकरीत्या उपलब्ध घटकांपासून तयार केलेले साहित्य पॅकिंगसाठी वापरता येईल; परंतु त्यात पॉलिथिलीन, पॉलिस्टीरिन, पीव्हीसी किंवा कोणत्याही सिंथेटिक पॉलिमरचा वापर केलेला नसावा. तसेच, वरून कागदी दिसणाऱ्या परंतु आतून प्लास्टिक किंवा धातूचा लेप असलेल्या पॅकेजिंगवरही पूर्णपणे बंदी असेल.
पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत बनवण्यात आलेल्या 'प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, २०१६' मधील तरतुदी पानमसाला पॅकेजिंगसाठी लागू राहतील, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. हे नवे नियम अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिवसापासूनच लागू करण्यात आले आहेत.
FSSAI ने २८ एप्रिल २०२६ रोजी सुधारित नियमांचा मसुदा प्रसिद्ध करून भागधारक आणि नागरिकांकडून ६० दिवसांच्या मुदतीत सूचना व आक्षेप मागवले होते. प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून आणि केंद्र सरकारच्या अंतिम मान्यतेने अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत हा नियम लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय केवळ पानमसाल्याच्या पॅकेजिंग साहित्यापुरता मर्यादित असून, पानमसाला या उत्पादनावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. प्लास्टिक आणि पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या घटकांचा वापर कमी करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.