

Railway compensation : रेल्वे प्रवासाच्या अवघ्या चार तास आधीपर्यंत तिकीट प्रतीक्षा यादीत (वेटलिस्ट) असल्याने ऐनवेळी विमानाचे तिकीट बुक करणाऱ्या एका प्रवाशाला ग्राहक आयोगामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विमानाचे तिकीट बुक केल्यानंतर लगेचच रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले; मात्र ते रद्द केल्यावर रेल्वेने तिकिट परतावा नाकारला. या प्रकरणी तिरुवनंतपुरम जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने ‘दक्षिण रेल्वे’ला सेवेतील त्रुटीसाठी दोषी ठरवले असून, ऐनवेळी कन्फर्म तिकीट दिल्याने प्रवाशाला झालेला आर्थिक व मानसिक त्रास विचारात घेऊन त्याला १९,७०० रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदाराच्या मुलीला भारतीय हवामान विभागात (IMD) सहाय्यक हवामान अधिकारी पदासाठी २२ जून २०१८ रोजी नवी दिल्ली येथील मुख्यालयात कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात आले होते. दिल्लीहून परतीचा प्रवास करण्यासाठी त्यांनी आयआरसीटीसी (IRCTC) द्वारे स्लीपर आणि थ्री-टीअर एसी वर्गवारीतील दोन तिकिटे रु. ६,७०० भरून बुक केली होती.
प्रवासाच्या दिवशी म्हणजे २२ जून २०१८ रोजी रात्री ११:३५ वाजता ट्रेन सुटणार होती. संध्याकाळी ७:२० वाजेपर्यंत तिकिटे प्रतीक्षा यादीतच होती. नवी दिल्ली येथील आयआरसीटीसी काउंटरवर विचारणा केली असता तिकिटे कन्फर्म होण्याची शक्यता धूसर वाटल्याने त्यांनी नाईलाजाने विमानाचे तिकीट बुक केले.
विमानाचे तिकीट बुक केल्यानंतर संध्याकाळी ७:३९ च्या सुमारास प्रवाशाला रेल्वे तिकीट कन्फर्म झाल्याचा मेसेज आला. तिकीट कन्फर्म झाल्याचे समजताच त्यांनी ते त्वरित रद्द करण्याचा प्रयत्न केला; मात्र इंटरनेटच्या समस्येमुळे रात्री ८:४५ वाजता तिकीट रद्द झाले. रेल्वेच्या नियमांनुसार प्रवासाच्या वेळेच्या चार तास आधी तिकीट रद्द न केल्याने रेल्वेने परतावा (रिफंड) देण्यास पूर्णपणे नकार दिला.
दक्षिण रेल्वेच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यानंतरच वेटलिस्ट तिकीट कन्फर्म होते, जे आधी सांगणे शक्य नसते. तसेच तिकीट रद्द करण्याचे नियम सार्वजनिक उपलब्ध आहेत आणि तिकीट रद्द न केल्यामुळे परतावा मिळाला नाही. तर आयआरसीटीसीच्या वकिलांनी स्पष्ट केले की चार्ट तयार करणे, तिकीट कन्फर्म करणे किंवा परतावा मंजुरीची प्रक्रिया ही पूर्णपणे रेल्वेच्या अखत्यारीत येते; यामध्ये आयआरसीटीसीची कोणतीही भूमिका नसते.
आयोगाचे अध्यक्ष पी. व्ही. जयराजन आणि सदस्य प्रीथा जी. नायर व विजू व्ही. आर. यांच्या पीठाने २७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात नमूद केले की, "गाडी सुटण्याच्या अवघ्या चार तास आधी तिकीट कन्फर्म झाल्याचा संदेश पाठवून रेल्वेनेच प्रवाशाला चार तास आधी तिकीट रद्द करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले. ही सेवेतील स्पष्ट त्रुटी आहे."
ग्राहक आयोगाने आयआरसीटीसीला दोषमुक्त ठरवत दक्षिण रेल्वेला मुळ तिकीटाची ६,७०० रुपये परतावा, मानसिक मानसिक त्रासाबद्दल १० हजार रुपये, कायदेशी खर्चबाबत ३००० रुपये अशी एकूण १९,७०० रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.