Indian Railways New Rule : रेल्‍वेत स्पीकरवर फोन चालवल्‍यास थेट जेलची हवा! भारी दंडही भरावा लागणार; रेल्वेचा नवीन नियम

Indian Railways New Rule
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : धावत्‍या रेल्‍वेत आणि रेल्‍वे स्‍थानकांवर मोबाईल फोनवर स्पीकर ऑन करून गाणी ऐकणे किंवा व्हिडीओ पाहणे आता प्रवाशांना महागात पडणार आहे. असा प्रकार करून इतर प्रवाशांना त्रास देणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावून थेट रेल्‍वे किंवा स्थानकातून बाहेरही काढले जाईल, असा इशाराच दक्षिण रेल्वेने दिला आहे. एवढेच नाही तर वारंवार नियम मोडल्यास ५ हजारांपर्यंत दंड आणि ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवासही सोसावा लागणार आहे.

स्वस्त इंटरनेट व स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे रेल्‍वेत स्पीकरवर रील, व्हिडीओ किंवा गाणी ऐकणे ही सामान्य समस्या बनली आहे. असे उपद्व्‍याप करणार्‍यांमुळे इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांच्या याच समस्येच्‍या निराकरणासाठी दक्षिण रेल्वेने जनविश्वास अधिनियमांतर्गत सुधारित रेल्वे कायद्यानुसार आपल्या सर्व विभागांना कडक निर्देश जारी केले आहेत.

कारवाईसोबतच रेल्वे स्थानकांवर आणि ट्रेनमध्ये प्रवाशांच्‍या जागरूकतेसाठी घोषणा केल्या जातील. हा मोहीम हिंदी, इंग्रजी व स्थानिक भाषांच्या पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीमद्वारे राबवली जाईल, जेणेकरून लोकांनी इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करावा आणि फोनवरही मोठ्या आवाजात बोलणे टाळावे.

अशी होणार कारवाई

  • रेल्‍वे किंवा रेल्वेस्‍थानक व परिसरात स्पीकरवर गाणी वाजवणे, मोठ्या आवाजात बोलणे किंवा सार्वजनिक उपद्रव केल्यास एक हजार रुपयांचा दंड आणि रेल्‍वे किंवा स्थानकातून हकालपट्टी.

  • वारंवार नियम उल्‍लंघन केल्‍यास ५ हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा ६ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास किंवा दोन्ही होऊ शकते.

  • हा नियम इतर रेल्वे झोन व मेट्रो रेल नेटवर्कमध्येही लागू होणार.

  • मेट्रोच्या सध्याच्या नियमांतही सहप्रवाशांना त्रास देणाऱ्यांना दंड आकारणीसह कोचमधून बाहेर काढण्याची तरतूद आहे.

  • रेल्‍वेतील तिकीट तपासणी कर्मचारी (टीटीई) आणि वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागेवरच एक हजार रुपयांचा दंड वसुलीचे अधिकार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news