

सोलापूर : रेल्वे प्रवाशांना दैनंदिन गरजेच्या असलेल्या वस्तू यापुढे स्थानकावरच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मध्य रेल्वेने किराणा साहित्याच्या लहान दुकानासाठी (किऑस्क) नियमावली केली आहे. प्रवासी भाडे व मालवाहतूक शुल्काव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून मिळालेले उत्पन्न ( नॉन-फेअर रेव्हेन्यू) अंतर्गत सुरू असलेल्या या स्टॉल्सवर आता डाळी, तांदूळ, खाद्यतेल, मसाले, पॅकबंद खाद्यपदार्थांसह लहान मुलांचे डायपर, बेबी फूड व सॅनिटरी पॅड्सही मिळणार आहेत.
या वस्तूंचा दर्जा राखण्यासाठी विक्रीसाठी परवानगी असलेल्या व प्रतिबंधित वस्तूंची यादी निश्चित करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा मानकांचे पालन करणे विक्रेत्यांना बंधनकारक असेल. तसेच स्टॉलपासून एक मीटरच्या परिसरात कचराकुंडी ठेवावी लागणार आहे. या निर्णयाने लांब पल्ल्याच्या प्रवासात आवश्यक वस्तू संपल्यास प्रवाशांना स्थानकाबाहेर जाण्याची गरज पडणार नाही. मात्र, चहा, कॉफी व इतर गरम पेयांची विक्री किराणा दुकानांत किवा अनधिकृत स्टॉल्सवर करता येणार नाही. ही पेये अधिकृत खाद्यगृहांतूनच उपलब्ध होतील. नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
या वस्तू मिळतील
जीवनावश्यक वस्तू स्थानकावरच उपलब्ध. डायपर, बेबी फूड, सॅनिटरी पॅड्सची सोय. पॅकबंद वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर जाण्याची गरज नाही. चहा, कॉफी व गरम पेय केवळ अधिकृत खाद्यगृहांतून मिळतील. अनधिकृत स्टॉल्सवर विक्रीस मनाई.
काय विकता येईल?
डाळी, तांदूळ, पीठ, तेल, साखर, मसाले, बिस्किटे, चिप्स, पॅकबंद ज्यूस, शीतपेये, दुग्धजन्य पदार्थ, टूथपेस्ट, शॅम्पू, डायपर व इतर बेबी केअर उत्पादने.
या वस्तूंवर बंदी?
उघडे किंवा स्टॉलवर शिजवलेले पदार्थ, ताजा चहा-कॉफी, अनधिकृत दुग्धजन्य पदार्थ, गुटखा, तंबाखू, सिगारेट आणि ज्वलनशील वस्तूंची विक्री प्रतिबंधित.