

Sonia Gandhi health update
नवी दिल्ली: ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. सोनिया गांधी यांच्या आरोग्याबाबत काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहीती देण्यात आलेली नाही.
काँग्रेस नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी गेल्या काही वर्षांपासून आरोग्यविषयक समस्यांनी त्रस्त आहेत. याच कारणामुळे त्या वेळोवेळी नियमित आरोग्य तपासणी आणि उपचारांसाठी रुग्णालयात जात असतात. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनिया गांधी १९९७ मध्ये कलकत्ता येथील पूर्ण अधिवेशनात औपचारिकपणे काँग्रेस पक्षाच्या सदस्या बनल्या. त्यानंतर १९९८ मध्ये त्या पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्ष झाल्या. त्या काळात काँग्रेस पक्ष नेतृत्वाचे संकट, अंतर्गत कलह आणि निवडणुकीतील पराभवाचा सामना करत होता. काँग्रेसची फक्त मध्य प्रदेश, ओडिशा आणि मिझोराम या तीन राज्यांत सत्ता होती.
सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली पक्षाने सलग दोन सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या आणि २००० च्या दशकात १६ राज्यांत सत्ता स्थापन केली. त्यानंतर २०१७ मध्ये सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत.