

Sonam Wangchuk Parliament March CJP
नवी दिल्ली : ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक सोनम वांगचुक यांनी सफदरजंग रुग्णालयातून देशवासीयांना उद्या (दि. २०) संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. "भीतीमुक्त आणि अन्यायमुक्त भारतासाठी ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे," असा संदेश त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरून पत्नी गीतांजली यांच्या माध्यमातून प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नीट परीक्षेतील गैख्यवहार आणि अनियमिततेमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी उपोषणस्थळावरून उचलून रुग्णालयात दाखल केले. या प्रकारामुळे उपोषणस्थळावर एकच गोंधळ उडाला होता. कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध केला असता त्यांना मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो उद्याच्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषणाच्या २१ व्या दिवशी बळजबरीने उचलून नेले असले तरी रुग्णालयातही त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवत उपचार घेण्यास नकार दिला आहे. आज रुग्णालयातून प्रसिद्ध केलेल्या संदेशात त्यांनी लिहिले आहे की, "२० जुलै हा भीतीमुक्त भारत, अन्यायमुक्त भारत आणि अन्यायातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा दिवस आहे. पेपरफुटीसारख्या अन्यायांविरोधात आणि बेकायदेशीर ताब्यासारख्या भीतीविरुद्ध हा दुसरा स्वातंत्र्यलढा आहे. संसदेवर काढण्यात येणारा हा मोर्चा यशस्वी करा," असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सांगितले की, ते उद्याच्या संसद मोर्चासाठी आपली ताकद जपून ठेवत आहेत. जंतर-मंतर येथे उपस्थित समर्थकांना संबोधित करताना त्यांनी, "आंदोलन अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे. त्यामुळे हे आंदोलन उद्याच संपणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे," असे म्हटले.
उद्या होणाऱ्या संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी १०० हून अधिक जवानांसह रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकड्या तैनात केल्या असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.