

नवी दिल्ली : दहशतवादाविरुद्धचे भारताचे झीरो टॉलरन्स धोरण घोषणा नव्हे, तर कार्यशैली आहे. आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारू. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान जगाने भारताचे हे बदललेले रूप पाहिले आहे, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी दहशतवाद व त्याला खतपाणी घालणाऱ्या देशांना इशारा दिला.
नवी दिल्लीत ‘रिपब्लिक फोर्सेस फर्स्ट कॉन्क्लेव्ह २०२६ : भारत-द डिफेन्स पॉवरहाऊस’ कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना निर्णायक व प्रभावीपणे चोख उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे, हे ऑपरेशन सिंदूरने हे स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूर हे तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक युद्धाचे उत्कृष्ट उदाहरण होते.
सिंह म्हणाले, गेल्या १२ वर्षांत सरकारने संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला सर्वोच्च प्राधान्य दिले. यामुळे देशाचे वार्षिक संरक्षण उत्पादन २०२५-२६ या आर्थिक वर्षात वाढून सुमारे १.७८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले. ते २०१३-१४ मध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपये होते. चालू वर्षी संरक्षण उत्पादन २ लाख कोटी आणि २०२९ पर्यंत ३ लाख कोटींच्या पुढे नेण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.