

sonakshi sinha support sonam wangchuk cjp 20 july sansad march
पुढारी ऑनलाईन : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरून हटवल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने त्यांना आणि आंदोलनकर्त्यांना उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे मागील 21 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची शनिवारी अचानक प्रकृती बिघडली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत आणि आंदोलनाबाबत आता बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत या संपूर्ण घडामोडींवर दुःख व्यक्त केले आणि आंदोलनकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला.
सोनाक्षी सिन्हा म्हणाली...
सोनाक्षी म्हणाली, "आज सोनम सरांसोबत जे काही घडले, ते अजिबात योग्य झाले नाही. मात्र, ते आता सुरक्षित आहेत आणि या कठीण काळात त्यांची पत्नी त्यांच्यासोबत आहे, याचा मला आनंद आहे. ते अजूनही खंबीर आहेत आणि पूर्णपणे शुद्धीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मी त्यांना आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असलेल्या हजारो लोकांना पाहत आहे."
आंदोलनकर्त्यांचे केले कौतुक
आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांचे आणि नागरिकांचे शांततापूर्ण व शिस्तबद्ध आंदोलनाचे सोनाक्षीने कौतुक केले. ती म्हणाली, "तेथे जमलेले सर्व लोक अत्यंत शांत, सन्मानपूर्वक आणि पूर्णपणे अहिंसक पद्धतीने सरकारसमोर आपली भूमिका मांडत आहेत. कोणत्याही देशाचे भविष्य त्याच्या युवा शक्तीत असते, हे आपण सर्वजण जाणतो. तुम्हा सर्वांना अशा ठामपणे उभे राहिलेले पाहून ही गोष्ट अधिक प्रकर्षाने जाणवते."
तिने पुढे म्हटले,
"इतक्या वेदना, इतकी निराशा आणि इतक्या दीर्घ प्रतीक्षेनंतरही तुम्ही ज्या शांततेने आणि सन्मानाने हा संघर्ष सुरू ठेवला आहे, त्यासाठी मी तुम्हा सर्वांना सलाम करते."
"तुमचा मार्ग बदलू नका"
20 तारखेला होणाऱ्या संसद मोर्चाचा उल्लेख करत सोनाक्षीने आंदोलनकर्त्यांना विशेष आवाहन केले.
ती म्हणाली,
"20 तारखेला या मोर्चात सहभागी होणाऱ्या सर्वांना माझी एकच विनंती आहे—तुमचा आवाज बुलंद ठेवा, पण तुमची आंदोलनाची पद्धत बदलू नका. या आंदोलनाची खरी ताकद म्हणजे 'Peace, Unity and Respect' म्हणजेच शांतता, एकता आणि परस्पर सन्मान. याच मार्गाने पुढे जात राहा."
"प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार"
लोकशाहीतील नागरिकांच्या अधिकारांबाबत बोलताना सोनाक्षी म्हणाली, "या देशातील प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. जेव्हा लोक हिंसा किंवा द्वेष न करता केवळ आशा आणि विश्वासाच्या बळावर पुढे येतात, तेव्हा त्यांचा आवाज अधिक प्रभावी ठरतो. सोनम सरांसोबत उभे राहून तुम्ही आम्हाला हेच दाखवून दिले आहे की, खरे धैर्य नेहमी मोठ्याने बोलण्यात नसते, तर शांततेने आणि ठामपणे उभे राहण्यात असते."
"मी देशाच्या युवकांसोबत आहे"
आपली भूमिका स्पष्ट करत सोनाक्षी म्हणाली, "मी देशाच्या युवकांसोबत आहे, विद्यार्थ्यांसोबत आहे, आपल्या संविधानासोबत आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशासोबत आहे. जसा प्रश्न विचारण्याचा अधिकार आपला आहे, तशीच चांगल्या भविष्याची अपेक्षा ठेवण्याचाही आपला अधिकार आहे."
व्हिडिओच्या शेवटी तिने हा तणाव लवकर संपेल, अशी आशा व्यक्त केली.
ती म्हणाली, "मला एवढीच अपेक्षा आहे की 20 तारखेला संवादाचे दरवाजे उघडतील, एकमेकांचे म्हणणे गांभीर्याने ऐकले जाईल आणि प्रत्येक आवाजाला त्याचा योग्य सन्मान मिळेल. मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे. ऑल द बेस्ट. जय हिंद."