

Shashi Tharoor Vs Congress
खासदार शशी थरूर आणि काँग्रेसमधील मतभेद वाढले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. मुरलीधरन यांनी थरुर यांना पक्षापासून वेगळे करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी नुकतेच म्हटले आहे की, जोपर्यंत थरूर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांच्या भूमिकेत बदल करत नाहीत; तोपर्यंत त्यांना तिरुअनंतपुरम येथील पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जाणार नाही.
मुरलीधरन पुढे म्हणाले की, थरूर हे काँग्रेस कार्यकारिणीचे (CWC) सदस्यदेखील आहेत. ते आता आमच्या पक्षाचे आहेत असे मानले जाणार नाही. त्यांच्यावर कोणती कारवाई करायची? हे आता पक्षश्रेष्ठी ठरवतील.
"जोपर्यंत थरूर यांची भूमिका बदलत नाही, तोपर्यंत त्यांना पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी बोलावले जाणार नाही. ते आता आमच्यासोबत नाहीत, असे समजा. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच येत नाही," असे मुरलीधरन म्हणाले.
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांवर थरूर यांची भूमिका काय आहे? याबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुरलीधरन बोलत होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीच्या मुद्यावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील सदस्य पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची थरुर यांच्याबद्दल प्रतिक्रिया समोर आली आहे.
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल माहिती देणाऱ्या भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व थरूर यांनी केले. थरूर यांनी म्हटले होते की, देशहिताला माझे नेहमीच पहिले प्राध्यान्य राहील. तसेच राजकीय पक्ष देशाला चांगले बनवण्यासाठी असतात.
थरूर यांनी याआधी असेही म्हटले होते की, 'देश प्रथम' या त्यांच्या भूमिकेबाबत अनेक लोक त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत. पण मी घेतलेल्या भूमिकेवर ठाम आहे. कारण मला वाटते की हे देशहितासाठी ही योग्य गोष्ट आहे, असे शनिवारी त्यांनी कोची येथे एका कार्यक्रमात स्पष्ट केले होते.
पहलगाम हल्ला आणि त्यानंतर राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळाने महत्त्वाच्या देशांना भेटी दिल्या होत्या. मोदी सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांचा समावेश होता. यानंतर काँग्रेस नेतृत्व आणि शशी थरूर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यात थरूर यांच्या अलीकडील काही विधानांमुळे हे मतभेद आणखी वाढले आहेत.