

नवी दिल्ली: राज्यात एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत कृषिमंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.
कोकाटे यांच्या आजवरच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढा वाचत सुळे यांनी थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे न्यायाची मागणी केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी दिल्लीत आयोजित सर्वपक्षीय बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषिमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडिओवर जोरदार टीका केली.
"एकीकडे दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय आणि राज्याचे कृषिमंत्री रमी खेळण्यात व्यस्त आहेत. ही कोणती नैतिकता आहे?" असा संतप्त सवाल सुळे यांनी उपस्थित केला. "जानेवारी ते मार्च या काळात ७६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मंत्री असे वागत असतील, तर हे विधीमंडळाचा आणि राज्यातील जनतेचा सरळसरळ अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कृषिमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. त्यांनी ऐकले नाही, तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्याय मागेन," असा इशाराही सुळे यांनी दिला.
कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्ये सुळेंच्या रडारवर
सुप्रिया सुळे यांनी यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पूर्वीच्या वादग्रस्त वक्तव्यांची आठवण करून देत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. कृषिमंत्री पद म्हणजे 'ओसाड गावची पाटीलकी' आहे, आता काय ढेकळांचे पंचनामे करायचे का?, 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही एक रुपयात पीक विमा दिला', 'कर्जमाफी झाली की तुम्ही साखरपुडे आणि लग्न करता', अशी विधाने करून त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची खिल्ली उडवली होती.
अधिवेशनात इतर मुद्द्यांवरही सरकारला घेरण्याचा इशारा
कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसोबतच सुप्रिया सुळे यांनी आगामी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि आरक्षणाचे मुद्दे उचलून धरणार असल्याचे स्पष्ट केले. "पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची आणि ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती पंतप्रधानांनी देशाला द्यावी. व्यापारासंदर्भात अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्यावर सरकारची भूमिका काय आहे, हे स्पष्ट करावे," अशी मागणीही त्यांनी केली. कृषिमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, या मुद्द्यावरून आगामी अधिवेशनात सरकारला धारेवर धरले जाण्याची दाट शक्यता आहे.