

Shashi Tharoor Veer Savarkar Award Controversy: काँग्रेसचे नेते आणि खासदार शशि थरूर यांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये आज दिला जाणारा 'वीर सावरकर पुरस्कार' त्यांना मिळणार असल्याची जी बातमी आहे, ती चुकीची आहे. त्यांनी सांगितले की त्यांना असा कोणताही पुरस्कार देणार असल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही आणि त्यांनी हा पुरस्कार स्वीकारलेलाही नाही.
थरूर यांनी लिहिलं की, त्यांना फक्त माध्यमांमधूनच समजलं की पुरस्कार प्राप्तकर्त्यांच्या यादीत त्यांचं नाव आहे. ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानासाठी केरळमध्ये गेले असताना प्रथमच पत्रकारांकडून त्यांना या पुरस्काराविषयी माहिती मिळाली.
थरूर म्हणाले, “मला या पुरस्काराबद्दल काहीही माहिती नव्हते, ना तो स्वीकारला आहे. आयोजकांनी माझी परवानगी न घेता माझे नाव घोषित करणे अत्यंत चुकीचे आहे.”
ते पुढे म्हणाले की “या पुरस्काराचे स्वरूप, आयोजक कोण किंवा कोणत्या संदर्भात हा पुरस्कार दिला जात आहे, याबाबत मला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा किंवा पुरस्कार स्वीकारण्याचा प्रश्नच नाही.”
शशि थरूर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी राष्ट्रपती भवनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या राजकीय डिनरवर भाष्य केलं होतं.
थरूर यांनी लिहिलं होतं की, त्या कार्यक्रमाचे वातावरण चांगले होते आणि तेथे उपस्थित अनेक व्यक्तींशी झालेली चर्चा सकारात्मक होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या या डिनरनंतर दुसऱ्याच दिवशी थरूर यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, 'शुक्रवारी रात्री राष्ट्रपती पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात झालेल्या डिनरला उपस्थित राहिलो. वातावरण अत्यंत आत्मीय होतं. अनेक मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि आनंद झाला, विशेषत: रशियन प्रतिनिधीमंडळातील सदस्य अत्यंत सौजन्यशील होते.'