

Congress ideological shift: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशि थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. थरूर यांनी सांगितले की, भाजपच्या वाढत्या ध्रुवीकरणाला रोखण्यासाठी काँग्रेसने गेल्या काही वर्षांत स्वतःमध्ये मोठे बदल केले आहेत आणि त्यामुळे पक्ष आज पूर्वीपेक्षा अधिक डाव्या विचारसरणीचा झाला आहे.
दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘रेडिकल सेंट्रिझम’ या विषयावर भाषण केल्यानंतर थरूर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले. काँग्रेस आणि डाव्या पक्षांमध्ये वाढत असलेली जवळीक याबद्दल त्यांनी सांगितले की, त्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू राजकीय तडजोडी नसून विचारसरणीतील अंतर कमी करणे हा आहे.
थरूर म्हणाले की डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात काँग्रेसचा दृष्टिकोन तुलनेने संतुलित आणि मध्यवर्ती होता. त्याकाळी पक्षाने काही क्षेत्रांत पूर्वीच्या भाजप सरकारच्या धोरणांतील चांगले मुद्देही स्वीकारले होते.
1991 च्या आर्थिक सुधारणांची आठवण करून देत थरूर म्हणाले, “नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी केलेल्या धोरणात्मक सुधारणांचा मार्ग पुढे भाजपनेही स्वीकारला. 1991 ते 2009 दरम्यानचा हा काळ तुलनेने मध्यममार्गी होता.” त्यांच्या मते, या नंतर विशेषतः विरोधात गेल्यानंतर काँग्रेसचा राजकीय सूर अधिक डावा झाला आहे.
थरूर म्हणाले, “भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला उत्तर देताना काँग्रेसने काही धोरणात्मक बदल केले आहेत. त्यामुळे पक्ष अधिक डाव्या विचारांकडे झुकलेला दिसतो. हा बदल पूर्णपणे विचारसरणीचा आहे की निवडणूक-रणनीतीचा, हा येणारा काळ ठरवेल”