

financial rules June 2025
दिल्ली : प्रत्येक महिन्याप्रमाणे जून महिन्यातही मोठे बदल होणार आहेत, ज्याचा तुमच्या खिशावर ताण पडणार आहे. यूपीआय, पीएफ पासून ते एलपीजी सिलेंडरच्या किमतीपर्यंत उद्या १ जूनपासून नियम बदलणार आहेत. यामुळे तुमचे महिन्याचे अर्थचक्र बिघडू शकते. यासोबतच तुम्हाला काही फायदे आणि सुविधा देखील मिळू शकतात. जाणून घ्या कोणते नियम बदलणार.
सरकार EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) चं ३.० चे नवीन व्हर्जन लाँच करणार आहे. जे जुन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यानंतर तुमचा पीएफ क्लेम खूप सोपा होईल. तुम्ही ATM आणि UPI द्वारे पैसे काढू शकता.
जूनमध्ये UIDAI ने दिलेली मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा संपणार आहे. त्याची अंतिम मुदत १४ जून आहे. तोपर्यंत तुम्ही आधार अपडेट केले नाही तर तुम्हाला या कामासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागेल.
जर तुम्ही कोटक महिंद्रा बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला १ जूनपासून मोठा झटका बसू शकतो. जर या बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्याचे ऑटो डेबिट व्यवहार अयशस्वी झाले तर बँकेकडून २ टक्के बाउन्स शुल्क आकारले जाऊ शकते. हे किमान ४५० रुपये आणि जास्तीत जास्त ५००० रुपये असू शकते. बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेच्या क्रेडिट कार्डवरील मासिक वित्त शुल्क वाढू शकतो. सध्या लागू असलेल्या ३.५० टक्के (४२ टक्के वार्षिक) वरून ३.७५ टक्के (४५ टक्के वार्षिक) पर्यंत वाढेल.
१ जून रोजी होणारा सर्वात मोठा बदल म्हणजे सीएनजी-पीएनजी आणि एटीएफचे दर बदलणार आहेत. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती तसेच एअर टर्बाइन इंधनाच्या किमतीमध्ये बदल करतात. मे महिन्यात त्यांच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. उद्या त्यात बदल होऊ शकतो.
एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या १ तारखेला बदलतात. उद्या त्यात बदल होऊ शकतो. मे महिन्याच्या सुरुवातीला, तेल विपणन कंपन्यांनी १४ किलो घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती बदलल्या नव्हत्या, मात्र १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रति सिलिंडर १७ रुपयांनी स्वस्त झाला होता.
जूनमध्ये बँका मुदत ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरात बदल करू शकतात. कारण रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ५ वर्षांच्या एफडीवरील व्याजदर ८.६ टक्के वरून ८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.
सेबीने ओव्हरनाईट म्युच्युअल फंड योजनांसाठी नवीन कट-ऑफ वेळ लागू केली आहे. हा नियम १ जूनपासून ऑफलाइन व्यवहारांसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत आणि ऑनलाइन व्यवहारांसाठी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर दिलेल्या ऑर्डर पुढील कामकाजाच्या दिवशी ग्राह्य धरल्या जातील.
एनपीसीआयने यूपीआय संदर्भात एक नवीन नियम लागू केला आहे. यूपीआय पेमेंट करताना वापरकर्त्याला फक्त प्राप्तकर्त्याचं (Ultimate Beneficiary) बँकिंग नाव दिसेल. क्यूआर कोड किंवा एडिट केलेले नाव यापुढे दिसणार नाही. हा नियम ३० जूनपर्यंत सर्व यूपीआय अॅप्सना लागू होऊ शकतो.