

दरवर्षी सुमारे आठशे टन सोन्याची उलाढाल देशात होत असते. त्यापैकी सत्तर टक्के वापर दागिने घडविण्यासाठी होतो. देशातील मागणीच्या नव्वद टक्के सोने आयात करावे लागते. बाहेर अनिश्चित, चिंताजनक वातावरण असताना त्यातील गुंतवणूक वाढली, असे अनेकदा घडले आहे. सद्यस्थितीतही त्याचे प्रत्यंतर येत आहे.
सोन्याला किमतीचा विक्रम, भरघोस परतावा, गुंतवणुकीचे निकष या तिन्ही कसोट्यांवर तपासून पाहिले, तर त्याची विश्वासार्हता खचितच उजळून निघालेली दिसते. सोन्याची खरेदी सुरक्षित असते. घेतलेले दागिने किंवा चोख सोने ग्राहकाच्याच ताब्यात राहत असल्याने या गुंतवणुकीत फसगत होण्याची शक्यता नसते. ते हवे तेव्हा विकता येत असल्याने ही तरलता अडीनडीला हमखास उपयोगी पडते. त्यावरील परतावाही ठीक असतो. त्यामुळे सोन्याच्या उपयुक्ततेविषयी समाजातील सर्वच आर्थिक स्तरांत विश्वासाची भावना आढळते.
आताचा ताजा विषय सोन्याच्या किमतीने प्रतितोळा (दहा ग्रॅम) एक लाख रुपयांपर्यंत मारलेली मजल हा आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे चार महिन्यांत 25 टक्के, तर वर्षभरात 35 टक्के लाभ सोन्याने मिळवून दिला आहे. असा घसघशीत परतावा सदासर्वकाळ मिळत नसतो. त्यामुळे सोन्याचा भाव सध्या परमोच्च बिंदूवर असताना नव्याने खरेदी करावी किंवा कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संबंधितांनी त्यावर निर्णय घेताना आधी काही मुद्दे ध्यानात घेतले पाहिजेत.
सोने सर्वार्थाने लाभदायी ठरत असले, तरी गुंतवणूक म्हणून त्याच्या मर्यादाही लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्याकडे चोख (शुद्ध स्वरुपातील) सोने घेण्यापेक्षा त्याचे दागिने घडविण्याकडे कल असतो. अलंकार तयार करण्यासाठी घडणावळीवर मोठा खर्च होतो. सोने विकताना हा खर्च परत मिळत नाही. शिवाय, दागिने मोडताना घट धरली जाते. अशा व्यवहारात ग्राहकाला साहजिकच आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी धातू स्वरूपात सोने घ्यायचे असेल, तर ते सुवर्णनाणे, बिस्किट वा तत्सम प्रकारांत घेणे योग्य ठरते. या खेरीज, गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड हे अधिक चांगले पर्याय आहेत. (सध्या देशात सर्वाधिक सोने दागिन्यांसाठी वापरले जाते. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, भारतीय महिलांकडे सुमारे पंचवीस हजार टन सोने दागिन्यांच्या स्वरूपात आहे!)
दुसरा मुद्दा म्हणजे, नेहमी जास्त परतावा मिळवून देणारे साधन, या द़ृष्टीने सोन्याकडे पाहिल्यास ती अपेक्षापूर्ती होण्याची खात्री नाही. परताव्यापेक्षाही महागाई, तसेच व्यक्तिगत वा बाहेरची अस्थिर आर्थिक स्थिती अशा वातावरणात कुटुंबाला भक्कम आधार देऊ शकणारा पर्याय म्हणून सोन्याला महत्त्व दिले जाते. केवळ परतावा हाच गुंतवणुकीचा मुख्य हेतू असेल, तर शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड यात अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकते.
केवळ विशिष्ट क्षेत्रात तेजीची लाट आली आहे, म्हणून साधकबाधक विचार न करता त्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न करणे आर्थिकद़ृष्ट्या मारक ठरू शकते. त्यामुळे सध्याच्या वातावरणात सोन्यात छोटी-मोठी गुंतवणूक करायची असेल, तर जाणकारांचा सल्ला घेऊनच पुढील पावले टाकली पाहिजेत. (उत्तरार्ध)
सोन्याचे भाव आता उच्च पातळीवर असले, तरी त्याचा आलेख दरवर्षी असाच उंचावत राहील, असे नाही. यापूर्वी काही वर्षी नकारात्मक परताव्याचीही नोंद झाली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे सोन्याने आता किमतीचे शिखर गाठले असताना, या टप्प्यावर खरेदी करणे व्यवहार्य ठरेल काय, याचा निर्णय अभ्यासपूर्वक घेतला पाहिजे. काही तज्ज्ञ सद्यस्थितीत वैयक्तिक पोर्टफोलिओचा आढावा घेण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते एकूण गुंतवणुकीत सोन्याचा वाटा जास्तीत जास्त दहा ते पंधरा टक्के असायला हवा. तेजीच्या वातावरणामुळे सोन्याचा हिस्सा या टक्केवारीपेक्षा जास्त झाला असल्यास, काही सोने विकून आपला पोर्टफोलिओ संतुलित केला पाहिजे.