India/Bharat : विद्यापीठांच्या पदवी व गुणपत्रिकांमध्ये आता ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’; RSS-संबंधित संस्थेचे अभियान

यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) संबंधित शिक्षण संस्कृती उत्थान न्यास ही संस्था अभियान राबवत आहे.
universities replace india with bharat in degrees marksheets
विद्यापीठांच्या पदवी व गुणपत्रिकांमध्ये आता ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’; RSS-संबंधित संस्थेचे अभियानPudhari News Network
Published on
Updated on

rss linked shiksha sanskriti utthan nyas several universities replace india with bharat in degrees marksheets

पुढारी ऑनलाईन : देशातील अनेक राज्य व केंद्रीय विद्यापीठांनी त्यांच्या पदवीपत्रिका, गुणपत्रिका, पत्रव्यवहार, निमंत्रणपत्रे आणि अगदी फलकांवरही ‘इंडिया’ या शब्दाऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्यास सुरुवात केली आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) संबंधित शिक्षण संस्कृती उत्थान न्यास ही संस्था अभियान राबवत आहे.

universities replace india with bharat in degrees marksheets
PM Narendra Modi leadership | ऐतिहासिक कार्यकाळ, परिवर्तनकारी नेतृत्व

रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राणी दुर्गावती विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या विद्यापीठात दिल्या जाणाऱ्या सर्व पदव्यांवर आता ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असे लिहिले जाणार आहे.

राणी दुर्गावती विद्यापीठाचे कुलगुरू राजेश कुमार वर्मा यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या सर्व पदवीपत्रिका आणि गुणपत्रिकांमध्ये हिंदी तसेच इंग्रजी भाषेत ‘भारत’ हा शब्द वापरला जाईल.

त्यांनी म्हटले, “G-20 परिषदेत ‘भारत’ हा शब्द वापरण्यात आला. आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपल्या देशाचे खरे नाव भारत आहे. ‘इंडिया’ हा शब्द नंतर प्रचलित झाला. त्यामुळे कार्यकारी परिषदेने सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये ‘भारत’ वापरण्याचा ठराव मंजूर केला आहे.”

universities replace india with bharat in degrees marksheets
Gyan Bharatam Mission : जम्‍मूमध्ये सापडला 'पारंपरिक' ज्ञानाचा खजिना; ‘ज्ञान भारतम्’ अंतर्गत ४०,००० हस्तलिखिते प्रकाशात!

वर्मा यांनी सांगितले की, या निर्णयाबद्दल त्यांच्या विद्यापीठाचा 2025 मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभात सन्मानही करण्यात आला होता. त्यांनी असेही नमूद केले की, हा देश सम्राट भरत यांच्या नावाने ओळखला जात असल्याने त्याचे मूळ नाव ‘भारत’च आहे.

देवी अहिल्या विद्यापीठानेही घेतला पुढाकार

इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठाने मध्य प्रदेशातील पहिले विद्यापीठ म्हणून हा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. कुलगुरू राकेश सिंघाई म्हणाले, “आम्ही सर्वप्रथम असा प्रस्ताव मंजूर करून सर्वत्र ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ लिहिण्यास सुरुवात केली. आमच्या निर्णयानंतर इतर विद्यापीठेही त्याच मार्गावर चालत आहेत.”

गुरु घासीदास विद्यापीठाचाही निर्णय

छत्तीसगडमधील बिलासपूर येथे असलेल्या केंद्रीय गुरु घासीदास विद्यापीठानेही ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

कुलगुरू आलोक कुमार चक्रवाल म्हणाले, “देशाचे खरे नाव ‘भारत’ आहे. ‘इंडिया’ हे नाव परकीयांनी दिले. सध्या जुन्या छापील गुणपत्रिका व पदव्यांचा साठा संपल्यानंतर नव्या कागदपत्रांमध्ये ‘भारत’ हा शब्द वापरला जाईल.”

शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाचे अभियान

या बदलामागे शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाची मोठी भूमिका असल्याचे सांगितले जाते. या संस्थेशी दिवंगत शिक्षणतज्ज्ञ दीनानाथ बत्रा यांचाही संबंध होता. भारतीय भाषा मंचाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य एम. एल. गुप्ता यांनी सांगितले की, ‘इंडिया’च्या जागी ‘भारत’ वापरण्यासाठी देशभर व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

त्यांच्या मते, “कोणत्याही देशाची दोन नावे असू नयेत. ‘भारत’ हेच देशाचे मूळ नाव आहे. ‘इंडिया’ हा शब्द सिंधू नदीच्या नावावरून आला असून ब्रिटिश काळात त्याचा वापर झाला. त्यामुळे आता ‘भारत’ हे नावच सर्वत्र वापरले पाहिजे.”

एम. एल. गुप्ता यांनी ‘इंडिया नहीं भारत’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, हजारो वर्षांपासून या राष्ट्राचे नाव ‘भारत’ आहे; मात्र स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये ‘India, that is Bharat’ असा उल्लेख करण्यात आला.

‘भारत’ला ‘भारत’च म्हणावे – मोहन भागवत

2025 मध्ये कोची येथे आयोजित राष्ट्रीय शिक्षण परिषदेत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते, “भारत ही एक संज्ञा आहे. तिचे ‘India is Bharat’ असे भाषांतर करू नये. भारत म्हणजे भारतच. त्यामुळे बोलताना, लिहिताना किंवा अधिकृत व्यवहारात ‘भारत’ला ‘भारत’च म्हणावे.”

संविधानात दोन्ही नावांचा उल्लेख

भारतीय संविधानात देशाचा उल्लेख ‘India, that is Bharat’ असा करण्यात आला आहे. त्यामुळे इंग्रजीत ‘India’ आणि हिंदीसह भारतीय भाषांमध्ये ‘भारत’ हे दोन्ही शब्द वापरले जातात.

2023 मध्ये G-20 परिषदेसाठीच्या राष्ट्रपतींच्या निमंत्रणपत्रावर ‘President of Bharat’ असा उल्लेख करण्यात आला होता. तसेच 2026 च्या प्रजासत्ताक दिनाच्या अधिकृत दस्तऐवजांमध्येही केंद्र सरकारचा उल्लेख ‘भारत सरकार’ असा करण्यात आला होता.

तथापि, केंद्र सरकार अनेक योजनांमध्ये अद्याप ‘इंडिया’ हा शब्द वापरत आहे. उदाहरणार्थ Make in India, Startup India आणि Stand-Up India यांसारख्या प्रमुख योजनांमध्ये ‘इंडिया’ हे नाव कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news