

सी. पी. राधाकृष्णन, उपराष्ट्रपती
भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुशासन, विकास आणि जागतिक स्तरावरील प्रभाव या क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन अनुभवायास आले आहे.
भारताने १० जून २०२६ रोजी आपल्या लोकशाहीच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून अखंड ४,३९९ दिवसांची सेवा पूर्ण केली. भारताचे सर्वाधिक काळ सलग कार्यरत राहिलेले लोकनियुक्त पंतप्रधान होण्याचा ऐतिहासिक मान मिळविला. हा ऐतिहासिक टप्पा केवळ राष्ट्रनिर्माणाप्रती त्यांच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे, त्याचबरोबर भारतीय जनतेने त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वास आणि श्रद्धेचे द्योतक आहे. हे त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, राष्ट्रीय विकासासाठी अथक समर्पण आणि भारतीय जनतेच्या कल्याण व आकांक्षांप्रती असलेल्या अविचल निष्ठेचे प्रतिबिंब आहे.
राष्ट्राचे प्रधानसेवक म्हणून नरेंद्र मोदी यांनी सुशासन आणि राष्ट्र प्रथम ही मार्गदर्शक तत्त्वे अंगीकारून भारतात अभूतपूर्व परिवर्तनाच्या युगाची सुरुवात केली. मानवी गुलामगिरीच्या प्रथेचा अंत करण्यासाठी आणि लाखो लोकांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी केलेल्या दृढ नेतृत्वाबद्दल इतिहास जसा अब्राहम लिंकन यांचे गौरवाने स्मरण करतो, त्याचप्रमाणे २५ कोटींहून अधिक नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढल्याबद्दल भविष्यातील पिढ्या मोदींचे स्मरण करतील. त्यांच्या दूरदर्शी, अथक प्रयत्नांमुळे आणि परिवर्तनकारी प्रशासनामुळे असंख्य कुटुंबांना संधी, सन्मान आणि आशेची नवी दिशा मिळाली आहे, आर्थिक स्वातंत्र्याची आणि उज्ज्वल भविष्याची आश्वासने साकारलेली पाहणे शक्य झाले आहे. मानवसेवेतील उल्लेखनीय यश ठरलेले त्यांचे हे योगदान इतिहासात कायमस्वरूपी राहील.
याशिवाय, त्यांच्या परिवर्तनकारी उपक्रमांमुळे लाखो लोकांना शिक्षण, निवारा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि अन्न सुरक्षा मिळाली. ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत ४४ कोटींहून अधिक नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवेची हमी उपलब्ध करून दिली. ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून १२ कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सुरक्षित आणि विश्वासार्ह सुविधा मिळाली. परिणामी, असंख्य कुटुंबांच्या जीवनमानात सुधारणा झाली. त्यांना सन्मानाने जगणे शक्य झाले. २०२० पासून अन्नधान्याच्या सातत्यपूर्ण मोफत वितरणामुळे सुमारे ८० कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा मिळाली. ४ कोटींहून अधिक कुटुंबांचे सुरक्षित व कायमस्वरूपी घराचे स्वप्न साकार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना, स्वाभिमान आणि उज्ज्वल भविष्याविषयी आशा दृढ झाली. हे सर्व उपक्रम कनवाळू प्रशासन आणि प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाप्रती बांधिलकीचे प्रतीक ठरतात.
पंतप्रधान मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे समाजातील प्रत्येक घटक मग तो महिला, युवा, शेतकरी किंवा वंचित वर्ग असो, सबल झाला आहे. ३ कोटींहून अधिक ‘लखपती दीदीं’चा उदय हा महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या त्यांच्या संकल्पनेचा प्रभावी पुरावा आहे, तर ‘नारी शक्ती’ अंतर्गत राबविलेल्या उपक्रमांमुळे महिलांना राष्ट्र बांधणीच्या प्रक्रियेत अधिक महत्त्वपूर्ण आणि सक्रिय भूमिका बजावता आली आहे. नव्या आयआयटी, एम्स, वैद्यकीय महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांच्या स्थापनेमुळे भारताच्या शिक्षण व आरोग्य सेवा क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे. देशातील नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. वंदे भारत रेल्वे गाड्यांचा झपाट्याने विस्तार, विमान तळ, महामार्ग आणि रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, देशातील अतिदुर्गम भागांपर्यंत पोहोचलेल्या परिवर्तनकारी संपर्क प्रकल्पांमुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक, परस्परांशी जोडलेल्या महत्त्वाकांक्षी भारताचा मजबूत पाया रचला आहे. या सुविधांमुळे आर्थिक विकासाला गती मिळाली आहे. देशभरातील लाखो नागरिकांचे जीवनमान सुधारले आहे. डिजिटल नवोन्मेष, सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, लसनिर्मिती आणि मोबाईल उत्पादन या क्षेत्रांमध्ये भारत जागतिक नेतृत्व म्हणून उभा असून, उदयोन्मुख तंत्रज्ञानांच्या क्षेत्रात प्रतिष्ठा वाढली आहे.
पंतप्रधान मोदी यांना समकालीन नेत्यांपेक्षा वेगळे ठरविणारी बाब म्हणजे त्यांना असलेला दृढ विश्वास की, प्रगती आणि परंपरा या परस्परविरोधी नसून परस्परपूरक शक्ती आहेत. 'विकासही, वारसाही' या त्यांच्या दूरदर्शी तत्त्वज्ञानाद्वारे त्यांनी हे दाखविले आहे की, एखादे राष्ट्र आपल्या सांस्कृतिक वारशाशी असलेली नाळ जपत वेगवान आधुनिकीकरणाच्या मार्गावर वाटचाल करू शकते. या तत्त्वज्ञानाचा सर्वाधिक लाभ झालेल्यांमध्ये तामिळनाडू आणि जगभरातील तमिळ समुदायाचा विशेष उल्लेख करावा लागेल. नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनशील नेतृत्वामुळे तमिळनाडूला चेन्नई मेट्रो रेल्वे विस्तार, चेन्नई बंगळुरू द्रुतगती महामार्ग, तामिळनाडू संरक्षण संचारमार्ग, बंदर आणि विमानतळ आधुनिकीकरण, महामार्ग विस्तारीकरण, रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास आणि नवीन पांबन रेल्वे पूल यांसारखे अनेक मोठे लाभ मिळाले आहेत. भारतातील पहिला उभी उचल यंत्रणा असलेला सागरी रेल्वे पूल अर्थात नवीन पांबन रेल्वे पुलाचे उद्घाटन हे एक ऐतिहासिक यश असून या प्रकल्पामुळे रामेश्वरमकरता संपर्क व्यवस्था अधिक सुलभ झाली आहे. हा पूल भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक आहे.
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पावर वेगवान वाटचाल केल्याने तामिळनाडू आता इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल फोन आणि आयफोन उत्पादनाचे आघाडीचे केंद्र म्हणून उदयाला आले आहे. मोदी यांच्या इतक्या सातत्याने, ठळकपणे आणि जागतिक स्तरावर पोहोचून तमिळ भाषा, संस्कृती आणि वारशाचे समर्थन यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी केलेले नाही, ज्यामुळे तमिळ सभ्यतेला नवी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली आहे. थोर तमिळ संत-कवी कानियान पूंगुनरनार यांच्या अमर वचनांचा 'याथुम ऊरे, यावरुम केळिर' उल्लेख त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात केला, तो क्षण तमिळ संस्कृतीसाठी आणि भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद होता. हा उदात्त संदेश जागतिक स्तरावर पोहोचवून त्यांनी तमिळ संस्कृतीमध्ये रुजलेली चिरंतन मानवतावादी मूल्ये आणि तिच्या समृद्ध सभ्यतेचा वारसा जगासमोर उलगडला. यामुळे जगाला उमगले की तमिळ विचारपरंपरेने 'संपूर्ण मानवजात एकच आहे' ही महान संकल्पना कार्ल मार्क्स यांच्याआधी अनेक शतकांपूर्वीच मांडली होती.
‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्त्वदेखील याच सार्वभौमिक आणि सर्वसमावेशक विचारधारेचे प्रतिबिंब आहे. काशी तमिळ संगमम आणि सौराष्ट्र तमिळ संगमम यांसारख्या उपक्रमांमुळे सांस्कृतिक बंध दृढ केले आहेत आणि संपूर्ण राष्ट्राला एका सूत्रात जोडणाऱ्या चिरस्थायी सभ्यतेचा दुवा यातून अधोरेखित झाला. आपल्या नवीन संसद भवनात ‘सेंगोल’ची स्थापना भारताच्या लोकशाही आणि सभ्यताविषयक वारशासाठी तमिळनाडूने दिलेल्या योगदानाची एक यथोचित पोचपावती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गंगैकोंडा चोलपुरम् येथील भेटीमुळे चोल साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाला आणि सांस्कृतिक वारशाला नव्याने उजाळा मिळाला. याशिवाय, परदेशात गेलेल्या भारताच्या अमूल्य पुरातन कलावस्तू आणि ऐतिहासिक वारसा परत मिळविण्याच्या प्रयत्नांनाही मोठी दाद मिळाली आहे. अलीकडेच भारतात परत आणण्यात आलेला ‘अनैमंगलम’ येथील चोलकालीन ताम्रपट हे त्याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे.
प्रत्येक युगात इतिहास अशा नेतृत्वाच्या उदयाचा साक्षीदार होत असतो, ज्यांची दूरदृष्टी आणि कार्य त्यांच्या काळाच्या मर्यादा ओलांडतात. अशा व्यक्ती युगपुरुष म्हणून ओळखल्या जातात. कारण, ते राष्ट्राच्या भाग्याला आकार देतात आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देतात. परिवर्तनशील नेतृत्व, राष्ट्रविकासाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि अथक लोकसेवेतून ते खऱ्याअर्थाने समकालीन भारताचे खरे ‘युगपुरुष’ म्हणून उदयास आले आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, त्यांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली आपला देश ‘विकसित भारत @ २०४७’ या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल करेल.