

पुढारी ऑनलाईन डेस्क
दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहाराच्या (Delhi Excise policy CBI case) सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आज गुरुवारी (दि.८) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांची न्यायालयीन कोठडी २० ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यांना आज तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.
केजरीवाल हे दिल्ली मद्य धोरण प्रकरणाचे मुख्य सुत्रधार असल्याचे सीबीआयने म्हणणे आहे. त्यांच्या अटकेशिवाय या प्रकरणाचा तपास होऊ शकत नाही म्हणत सीबीआयने २६ जून रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. तत्पुर्वी ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. दरम्यान, १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. मात्र सीबीआय प्रकरणामुळे ते अजूनही तुरुंगात आहेत. दरम्यान, केजरीवाल यांना २० जून रोजी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.
अरविंद केजरीवाल यांना याआधी ८ ऑगस्टपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपली होती. यामुळे त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.
अरविंद केजरीवाल यांच्या सीबीआयच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी ५ ऑगस्ट रोजी फेटाळली. तसेच त्यांना जामीन अर्जासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगितले होते. यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.