

West Bengal CM Suvendu Adhikari
कोलकाता : पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेत्याच्या (शुभेंदू अधिकारी) वैयक्तिक सहाय्यकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होणारा मोठा हल्ला अधिकारी यांच्या हस्तक्षेपामुळे टळला, असा दावा तृणमूल काँग्रेसचे निलंबित प्रवक्ते ऋजू दत्ता यांनी केला आहे. त्यांनी मुक्तकंठाने शुभेंदू अधिकारी यांची स्तुती केली आहे. शुभेंदू अधिकारी यांनी सूडाचे राजकारण थांबवून मोठी हिंसाचार टाळला, असे विधान दत्ता यांनी केल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
शिस्तभंग आणि पक्षाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ऋजू दत्ता यांना तृणमूल काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. वृत्तासंस्था 'एएनआय'शी बोलताना ऋजू दत्ता म्हणाले, "शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या किमान ५,००० कार्यकर्त्यांचे प्राण वाचवले आहेत. ६ मे रोजी त्यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांनी त्या रात्री सूड घेण्याचे आवाहन केले असते, तर बंगालमध्ये ५,००० तृणमूल कार्यकर्ते मारले गेले असते. मात्र, त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले."
शुभेंदू अधिकारी यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक करताना दत्ता म्हणाले की, "भारताच्या इतिहासातील पहिल्या १० राजकारण्यांची यादी केल्यास त्यात ममता बॅनर्जींचे नाव नक्कीच असेल; पण शुभेंदू अधिकारी यांचा 'सीव्ही' वेगळा आहे. ते खासदार राहिले आहेत, कॅबिनेट मंत्री राहिले आहेत आणि त्यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर बसण्यास पात्र असणारी ती एकमेव व्यक्ती आहे."
दत्ता यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वावर संघटनात्मक अपयशाचा आरोप केला. "ममतादिदी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे की, एका बाहेरील संस्थेने (I-PAC) संपूर्ण पक्ष कशा प्रकारे ताब्यात घेतला," अशी टीका त्यांनी केली. बाहेरील एजन्सीमुळे पक्षाची कार्यपद्धती बिघडल्याचा आरोपही त्यांनी केला.
निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे.मनोज तिवारी: माजी क्रीडा राज्यमंत्री मनोज तिवारी यांनी ज्येष्ठ मंत्री अरूप विश्वास यांच्यावर टीका करत विकासकामात अडथळे आणल्याचा आरोप केला. "या भ्रष्ट सरकारला जनतेने योग्य धडा शिकवला आहे," असे तिवारी म्हणाले. कृष्णेंदू नारायण चौधरी आणि कोलकाताचे उपमहापौर अतिन घोष यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, पक्षाच्या घसरणीला त्यांना जबाबदार धरले आहे.रत्ना चॅटर्जी यांनीही प्रचाराच्या काळात नेतृत्वाशी संपर्क होऊ शकला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "नेत्यांनी व्यक्त केलेली ही मते वैयक्तिक आहेत. जोपर्यंत पक्षाच्या अधिकृत चॅनेलवरून माहिती दिली जात नाही, तोपर्यंत ती पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाऊ नये," असे पक्षाने स्पष्ट केले आहे.