

पश्चिम बंगाल: २९३ जागा (एकूण २९४ जागा, परंतु एका जागेचा निकाल अद्याप प्रलंबित आहे.)
BJP - १९८
TMC - ८९
INC - २
OTH - ४
भवनीपूरमध्ये ईव्हीएम मतमोजणीच्या पाच फेऱ्यांनंतर, ममता बॅनर्जी यांनी २५,९४२ मतांनी भक्कम आघाडी घेतली आहे, तर भाजपचे सुवेंदू अधिकारी ९,२३६ मतांनी मागे आहेत. मतमोजणी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे दोघांमधील अंतर लक्षणीयरीत्या वाढले आहे.
भाजपने बंगालमध्ये २०० जागांचा टप्पा गाठला आहे. भाजप १९५ जागांवर आघाडीवर आहे, तर टीएमसी ९१ जागांवर पुढे आहे. इतर पक्ष पाच जागा जिंकण्याची शक्यता आहे.
बंगालमधील चित्र अधिकाधिक स्पष्ट होत आहे. भाजपने बंगालमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. ट्रेंडनुसार भाजप १६५ जागांवर विजयी होत असून, टीएमसी १२३ जागांवर आघाडीवर आहे.
बंगालमध्ये मतमोजणी सुरू आहे. बंगालमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत. ते पक्षाच्या कार्यालयाबाहेर भाजपचे झेंडे, पंतप्रधान मोदींचा फोटो आणि कमळाची फुले घेऊन उभे आहेत. ते 'जय श्री राम'च्या घोषणा देत आहेत आणि त्यांच्या हातात मिठाई आहे. प्रत्येकजण म्हणत आहे की ते २०० हून अधिक जागा जिंकतील.
भाजपला मिळत असलेल्या आघाडीचा संदर्भ देत सुवेंदू अधिकारी कोलकात्यात म्हणाले, "सर्व हिंदू एकवटले आहेत. ते नरेंद्र मोदींसोबत आहेत. भाजप बंगालमध्ये बहुमत मिळवेल."
बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार अडचणीत आलेले दिसत आहे. ट्रेंडनुसार भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप १४९ जागांवर आघाडीवर आहे, तर टीएमसी ९२ जागांवर आघाडीवर आहे.
बंगालमध्ये भाजपला यशाची चिन्हे दिसत आहेत. प्राथमिक कलानुसार भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत.
भाजपचे राज्यसभा खासदार राहुल सिन्हा म्हणाले, "आम्ही भक्कम आघाडी कायम ठेवली आहे. बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. कमळ फुलणार आहे. हे भाजप कार्यकर्त्यांच्या संयम आणि समर्पणाचे फळ आहे. मुख्यमंत्री कोण होणार, हे सर्वोच्च नेतृत्व ठरवेल. ममता बॅनर्जी भवानीपूरची जागा गमावतील. टीएमसी सरकारने केवळ जनतेवर अत्याचार केले आहेत."
बंगालमध्ये टीएमसीने आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांचा पक्ष सध्या ७५ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप ७१ जागांवर आघाडीवर आहे. इतरांकडे दोन जागा आहेत.
पश्चिम बंगालमध्ये एकूण २९३ विधानसभा जागा आहेत. या जागांसाठी मतदान दोन टप्प्यांत पार पडले. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी १५२ जागांसाठी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी १४२ जागांसाठी मतदान झाले. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) दणदणीत विजयाचे लक्ष्य ठेवत आहे, तर भाजपलाही दणदणीत विजयाचा विश्वास आहे. स्वातंत्र्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ९२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक मतदानाची नोंद आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यात लढत आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत विक्रमी मतदान झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र निकालाच्या दिवशी पावसाची शक्यता असल्याने विजयाचा जल्लोष करण्याची तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फेरू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, यंदा पश्चिम बंगालमध्ये तब्बल ९२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. स्वातंत्र्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील हे सर्वाधिक मतदान मानले जात आहे. महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केले असून महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा जास्त राहिला.
या निकालातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्ता राखणार का, की भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवणार, याचा फैसला होणार आहे. ममता बॅनर्जी यांनी मतदानानंतर पक्ष २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला होता.
दुसरीकडे बहुतेक एक्झिट पोलमध्ये भाजपला आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही सर्वेक्षणांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही सर्वेक्षणांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर होण्याची शक्यता सांगितली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यंदा स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूर या मुस्लिमबहुल भागांमध्ये पक्षाला काही जागांची आशा आहे. तर Communist Party of India (Marxist) आणि Indian Secular Front आघाडीनेही पुन्हा आपले अस्तित्व मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील काही दिवस पाऊस, वादळी वारे आणि मेघगर्जनेसह हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे निकालानंतर होणाऱ्या विजय मिरवणुका आणि जल्लोषावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
४ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. राज्यातील २९४ विधानसभा मतदारसंघांचे निकाल जाहीर होताच पश्चिम बंगालच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार आहे.