West Bengal Assembly Election : ममता बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेर 'जय श्री राम'चा जयघोष! घोषणाबाजीने परिसर दुमदुमला

प. बंगालमध्ये भाजपने उधळला विजयाचा गुलाल, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक
West Bengal Assembly Election : ममता बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेर 'जय श्री राम'चा जयघोष! घोषणाबाजीने परिसर दुमदुमला
Published on
Updated on

Jai Shri Ram Chants Outside Mamata Banerjee Residence by BJP Workers

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. 'जय श्री राम'च्या घोषणांनी या परिसरातील राजकीय पारा वाढला असून, याचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.

पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या कलानुसार भाजपला मोठे यश मिळाल्याचे स्पष्ट होताच, कोलकात्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना घोषणाबाजी थांबवून तिथून निघून जाण्याची विनंती केली. सुदैवाने, या ठिकाणी कोणतीही मोठी झटापट झाली नाही, परंतु या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

'जय श्री राम'चा नारा: बंगालमधील राजकीय संघर्षाचे प्रतीक

पश्चिम बंगालच्या राजकारणात 'जय श्री राम' हा नारा केवळ धार्मिक नसून तो एक प्रखर राजकीय प्रतीक बनला आहे. भाजपकडून सातत्याने या नाऱ्याचा वापर प्रचारात केला जातो, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी अनेकदा या नाऱ्याबाबत आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराबाहेर झालेली घोषणाबाजी तृणमूल काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी मानली जात आहे.

जुने वाद पुन्हा चर्चेत

या घटनेमुळे ममता बॅनर्जी आणि 'जय श्री राम' या नाऱ्याशी संबंधित जुन्या वादांना पुन्हा उजाळा मिळाला आहे. २०२१ मध्ये एका सरकारी कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर उपस्थित असताना, प्रेक्षकांमधून काही लोकांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या होत्या. यामुळे संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी भाषणास नकार दिला होता. "सरकारी कार्यक्रमात शिष्टाचार पाळला पाहिजे, कुणाला निमंत्रित करून त्यांचा अपमान करणे अयोग्य आहे," असे म्हणत त्यांनी आपला निषेध नोंदवला होता.

तसेच, २०१९ मध्ये पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील चंद्रकना येथे त्यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवरही ममता बॅनर्जी भडकल्या होत्या. त्यावेळी त्यांनी गाडीतून खाली उतरून संबंधितांना कडक शब्दांत सुनावले होते. आजच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा त्याच नाऱ्याचा वापर करून तृणमूल काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news