

Nagaur Ammonium Nitrate Seized: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक बंदोबस्त असताना, राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत जवळपास 10 हजार किलो स्फोटक जप्त केलं आहे. रविवारी (25 जानेवारी) पोलिसांनी एका घरावर छापा टाकून 9,550 किलो अमोनियम नायट्रेट ताब्यात घेतलं. या प्रकरणात सुलेमान खान नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नागौरचे पोलीस अधीक्षक मृदुल कच्छावा यांनी सांगितलं की, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांच्या विशेष पथकाने थानवला परिसरातील सुलेमानच्या घरावर छापा टाकला. तपासात मोठ्या प्रमाणावर स्फोटक साठवून ठेवण्यात आल्याचं समोर आलं.
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने हे स्फोटक आपल्या शेतात लपवून ठेवले होते. या कारवाईत पोलिसांना—
187 कार्टनमध्ये 9,550 किलो अमोनियम नायट्रेट
डेटोनेटरचे 9 कार्टन
निळ्या वायरचे 15 बंडल
लाल वायरचे 9 बंडल
इतर काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
नागौर एसपींनी सांगितलं की, सुलेमान खानविरोधात यापूर्वीही थानवला, पाडुक्कल्लन आणि अलवर परिसरात स्फोटकांशी संबंधित एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे स्फोटक कायदा अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत. या नव्या प्रकरणात पोलिसांनी सुलेमानवर भारतीय न्याय संहिता आणि स्फोटक अधिनियम 1884 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, सुलेमान खान अनेकांना स्फोटकांचा पुरवठा करत असल्याचीही माहिती आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात साठा आढळल्यामुळे हे केवळ पुरवठ्यापुरतं मर्यादित नसून मोठ्या कटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांनाही यात सहभागी केलं जाऊ शकतं, असंही पोलिसांनी सांगितलं आहेत.
पोलिसांनी सांगितलं की, अमोनियम नायट्रेट हा पदार्थ यापूर्वीही अनेक मोठ्या स्फोटांशी संबंधित राहिला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात देखील अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याची माहिती आहे.
तसंच 2 डिसेंबरला नाथद्वारा श्रीनाथजी परिसरात अवैध स्फोटकांनी भरलेला एक पिकअप ट्रक जप्त करण्यात आला होता. त्या ट्रकमधील स्फोटकांमुळे सुमारे 10 किलोमीटरपर्यंत मोठं नुकसान होऊ शकतं, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीने इतकं मोठं स्फोटक नेमकं कुठून आणलं, कोणाला द्यायचं होतं आणि यामागे आणखी कोण सहभागी आहेत का, याचा तपास केला जात आहे.