Belgaum Crime : महाराष्ट्र पोलिस लवकरच बेळगावात
बेळगाव : गेल्या ऑक्टोबरमध्ये चोर्ला घाटात कथितरित्या घडलेल्या 400 कोटींच्या लुटीप्रकरणी नाशिक पोलिस लवकरच बेळगावात दाखल होणार असून, त्यांना तपासासाठी बेळगाव पोलिस सहकार्य करतील, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी रविवारी दिली.
पत्रकारांशी बोलताना रामराजन म्हणाले, नाशिक जिल्हा पोलिस प्रमुखांकडून 16 जानेवारीला पत्र आले असून चोर्ला घाटात सुमारे 400 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर दरोडा पडल्याचे या पत्रात नमूद आहे. 22 ऑक्टोबर 2025 रोजी संदीप दत्ता पाटील (रा. हरीओमनगर, नाशिक) नावाच्या व्यक्तीचे नाशिकमध्ये अपहरण करण्यात आले होते. 16 ऑक्टोबररोजी सुमारे 400 कोटी रुपयांची रक्कम चोर्ला घाटात लुटण्यात आली होती. त्या लुटीत संदीपचा सहभाग होता, असे अपहरणकर्त्यांचे म्हणणे होते. बेळगाव पोलिसांनी नाशिकमध्ये जाऊन संदीप पाटील यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांचे अपहरण करणाऱ्यांनीच लूट केली असल्याचे त्याने सांगितले आहे. महाराष्ट्र पोलीस बेळगावात लवकरच दाखल होणार आहेत. ते तपास करणार असून त्यांना सर्व ते सहकार्य आम्ही करु, असे रामराजन म्हणाले.
विराट गांधीच्या सांगण्यावरूनच अपहरण
लूट प्रकरणात विराट गांधी हा मुख्य संशयित आहे. मात्र लुटीचा आळ संदीपवर घालण्यासाठी विराटने विशाल नायडू या आपल्या साथीदाराला संदीप पाटीलकडे चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार विशाल नायडू व आणखी तिघांनी संदीपचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र लुटीशी आपला संबंध नसल्याचे संदीपने त्याला सांगितले. त्यानंतर संदीपला सोडून देण्यात आले. संदीपने अपहरणाची तक्रार नाशिक पोलिसांत 9 जानेवारीरोजी दिली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.

