

नागपूर - कधी नागपूरच्या या ना त्या चौकात बसून भीक मागत उदरनिर्वाह चालायचा. आज काळ बदलला, निमंत्रित विशेष अतिथी म्हणून उद्या राजपथावर बसून प्रजासत्ताक दिनाची परेड आम्ही पाहणार, या कृतज्ञतेच्या भावनेनेच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु ओघळले.
पुनर्वसित भिक्षेकऱ्यांना यावेळी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडसाठी विशेष आमंत्रण दिले गेले आहे. नागपूर महानगरपालिका व सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेला ‘आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारा केंद्र’ हा उपक्रम समाजातील वंचित घटकांसाठी आशेचा किरण म्हणता येईल.
मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचे पुढ़ाकारातुन व अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी तसेच उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे काम सुरु असून, सन २०२२ पासून या उपक्रमांतर्गत १३३० हून अधिक भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आले. निवारा, आरोग्यसेवा, समुपदेशन, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. नागपुरातील यातीलच तीन पुनर्वसित लाभार्थ्यांना 26 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास देशभरातून निवडलेल्या 100 विशेष आमंत्रितांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
शरीफ शेख (वय : 61 वर्षे), अनिल जुनघरे (वय : 52 वर्षे), गायाबाई शुक्ला (वय : 70 वर्षे)हे ते तीन लाभार्थी आहेत. स्माइल आस्था उपक्रम बाबत प्रशंसनीय स्वयंलिखित पत्र व नागपूरची विशेष ओळख असलेले झीरो स्माइल प्रतिमा ते महामहीम राष्ट्रपति व पंतप्रधान यांना देणार आहेत.
‘आस्था’ व स्माइल उपक्रम हा भिक्षेकरीमुक्त, सर्वसमावेशक आणि सशक्त समाज निर्मितीच्या केंद्र सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असून, पुनर्वसनाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना आत्मनिर्भर बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य यातून केले जात आहे.
राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वाच्या कार्यक्रमात पुनर्वसित लाभार्थ्यांचा सहभाग हा शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांचा परिपाक असून या लाभार्थ्यांसोबत कार्यालयीन प्रतिनिधी गौतम नागरे, वार्डन, राकेश गाठे, व्यवस्थापक, अधीक्षिका अनिता गंधर्वार देखील दिल्लीला रवाना झाले आहेत.