

Rajasthan Newborn News
भिलवाडा : 'आई मी इथे आहे... माझा श्वास गुदमरतोय गं... माझे छोटे-छोटे हात तुझ्या हाताचा स्पर्श शोधत आहेत... माझ्या पायांना तुझा आधार हवा आहे... पण हे दगड… हे फेविक्विक… मला तुझ्यापर्यंत येऊ देत नाहीयेत. माझी हाक कोणालाच ऐकू येत नाही का...' राजस्थानमधील भिलवाडा येथे दगडांखाली दबलेल्या १० दिवसांच्या निरागस बाळाला बोलता आले असते, तर त्याने कदाचित आपल्या आईला हेच सांगितले असते.
प्रत्येक श्वास त्याच्यासाठी एक संघर्ष होता. फेविक्विकने त्याचे छोटे-छोटे ओठ चिटकवले होते. वर ठेवलेल्या मोठ्या दगडांचा दाब त्याच्या नाजूक शरीरावर होता. तरीही, त्याच्या हृदयात जगण्याची आशा जिवंत होती. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील सीताकुंड जंगलात मंगळवारी दुपारी माणुसकीला हादरवणारी घटना समोर आली. १०-१२ दिवसांचे एक नवजात बाळ जंगलात दगडांच्या ढिगाऱ्याखाली ठेवलेले आढळले. रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडामध्ये फेविक्विक लावला होता.
पण, तो चिमुकला जीव आपल्या छोट्या-छोट्या हातांनी आणि पायांनी संघर्ष करत होता. त्याची लहानशी धडधड जगण्याची आशा धरून होती. दगडांच एवढं मोठ ओझ आणि तोंडाला फेविक्विक असूनही, कदाचित 'आई… मला सोडून जाऊ नकोस...' असच त्याच हृदय अजूनही बोलत होत. त्याचवेळी जवळच एक गुराखी आपल्या जनावरांना चारत आला. त्याला हलकासा आवाज ऐकू आला. निरागस बाळाची ही लहानशी हाक त्याची शेवटची आशा होती. जवळ जाऊन त्याने पाहिले की दगडांखाली एक बाळ ठेवले आहे आणि त्याचे ओठ फेविक्विकने चिटकवलेले आहेत.
गुराख्याने लगेच आजूबाजूच्या गावकऱ्यांना सांगितले. गावकरी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. बाळाला बाहेर काढताना, त्याच्या नाजूक त्वचेवर दगडांचे व्रण आणि जखमा स्पष्टपणे दिसत होत्या. तोंडाला लावलेल्या फेविक्विकमुळे त्याला रडता आणि श्वास घेता येत नव्हते. पण प्रत्येक श्वासात जगण्याची आशा मात्र जिवंत होती. त्यानंतर बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.