

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील बारावे गावात रविवारी पहाटेच्या सुमारास मानवी संवेदनांना हेलावून टाकणारा संतापजनक प्रकार उघडकीस आला. गोणीत गुंडाळलेले स्त्री जातीचे नवजात अर्भक कचराकुंडीत आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ माजली आहे. एकीकडे या बाळाची प्रकृती ठणठणीत असून तिला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे खडकपाडा पोलिसांनी या बाळाला बेवारस स्थितीत फेकून देणाऱ्या तिच्या निर्दयी माता-पित्याचा शोध सुरू केला आहे.
बारावे गाव रविवारी पहाटे हळूहळू जागा झाला. आदल्या दिवशी घरात दिवसभर जमा झालेला कचरा टाकण्यासाठी काही ग्रामस्थ शिवमंदिराजवळ असलेल्या कचराकुंडीकडे गेले. या ग्रामस्थांना कुंडीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. गोणीत लपेटलेल्या स्थितीत असलेले हे गोंडस बाळ कुणाचे असावे ? यावर ग्रामस्थांनी चर्चा करून त्याच्या माता-पित्याचा शोध सुरू केला. मात्र बाळावर अधिकार सांगण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. बेवारस स्थितीत फेकलेल्या या बाळाची ग्रामस्थांना कीव आली.
कचराकुंडीतून बाळाला सुरक्षित बाहेर काढून ग्रामस्थांनी ही माहिती खडकपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केल्यानंतर या निरागस बाळाला कल्याणच्या बाई रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल केले. बालरोग तज्ज्ञांनी तपासल्यानंतर चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. या बाळाला पुढील उपचारांसाठी वसंत व्हॅलीतील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हे अर्भक स्त्री जातीचे आहे. बाळ जन्माला आले, पण वंशाला दिवा नव्हता. त्यामुळे स्त्री जातीच्या या बाळाचा तिच्या निष्ठूर माता-पित्याने परित्याग केला असावा किंवा अनैतिक संबंधातून जन्म दिल्याने समाजात बदनामी होईल या भीतीने बाळाला बेवारसस्थितीत निर्जनस्थळी फेकले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. या निर्दयी कृत्यामागील पालकांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करून तपास सुरू केला आहे.