

Rahul Gandhi Phone Tapping: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोन टॅपिंगचा गंभीर आरोप केला आहे. माझ्या फोनमध्ये माझ्या सर्व आरोपांचे पुरावे आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी माझा फोन टॅप करत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. याचवेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा समोरासमोर जाहीर चर्चेचे आव्हान दिले आहे. दोघांमध्ये थेट चर्चा झाली, तर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवरील 'आस्क मी' या प्रश्नोत्तराच्या सत्रात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध राजकीय मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. भाजप संसदेत चर्चेसाठी तयार असताना तुम्ही सार्वजनिक चर्चेचा आग्रह का धरता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, संसदेत मला अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलू दिले जात नाही. अनेकदा माझा माइक बंद केला जातो. त्यामुळे संसदेत चर्चा करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत थेट समोरासमोर चर्चा व्हावी, अशी माझी इच्छा आहे.
राहुल गांधी यांनी फोन टॅपिंगबाबतही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "माझ्या सर्व आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. मात्र, पंतप्रधान माझा फोन टॅप करत आहेत."
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत थेट चर्चा झाल्यास परदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर कोण काम करत आहे, देशविरोधी कोण आहे आणि अशा कारवायांमध्ये कोण कधीपासून सहभागी आहे, हे स्पष्ट होईल, असा दावा त्यांनी केला. याशिवाय आणखी काही महत्त्वाची माहिती आपल्याकडे असून ती फोनमध्ये असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी संसदेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपल्याला बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला. यामध्ये कृषी कायदे, मतचोरी, एसआयआर, चीनसोबतचे संबंध, जनरल नरवणे यांचे पुस्तक आणि एपस्टीन प्रकरण यांसारख्या मुद्द्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्याला तासन्तास चालणारी भाषणबाजी नको आहे. त्याऐवजी पंतप्रधान आणि आपण एकमेकांसमोर बसून थेट प्रश्न विचारावेत आणि त्यांची उत्तरे द्यावीत, अशी आपली भूमिका असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
या चर्चेसाठी गौतम अदानी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना परीक्षक म्हणून नेमले तरी आपली हरकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचे आव्हान देताना राहुल गांधी यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले, "माझी खात्री आहे की माझ्यासोबत समोरासमोर चर्चा झाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत." राहुल गांधी यांनी यापूर्वीही अनेकदा पंतप्रधान मोदी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांचे चर्चेचे आव्हान फेटाळले आहे. संसदेत चर्चा करण्यापासून राहुल गांधीच पळून जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही राहुल गांधी यांच्या भूमिकेवर टीका केली होती. संसद हे चर्चेसाठी उपलब्ध असलेले अधिकृत व्यासपीठ आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी अधिक जबाबदारीने आणि गांभीर्याने आपली भूमिका मांडली पाहिजे, असे त्या म्हणाल्या होत्या.