

व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) आणि भारतीय हवाई दल आणि परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, पाकिस्तानमधील किराना हिल्सवर कोणताही हल्ला झाला नाही आणि पाकिस्तानमधील कोणत्याही अणुऊर्जा केंद्रातून रेडिएशन गळती झालेली नाही.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाच्या पाकिस्तानमधील कारवाईनंतर, तेथे रेडिएशन गळती होत असल्याचा दावा केला जात आहे. आता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे. पाकिस्तानमधील कोणत्याही अणुऊर्जा केंद्रातून रेडिएशन गळती किंवा उत्सर्जनाची कोणतीही घटना घडलेली नाही, असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने बुधवारी (दि.१४) सांगितले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानमधील कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग किंवा रेडिओऐक्टिव्ह गळती झाल्याचे कोणतेही पुरावे सध्या उपलब्ध नाहीत.
"आम्हाला या अहवालांची माहिती आहे. एजन्सीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील कोणत्याही अणुसुविधेतून रेडिएशन गळती किंवा किरणोत्सर्ग झालेला नाही," असे आयएईएच्या प्रेस विभागाचे फ्रेडरिक डहल यांनी टाईम्स ऑफ इंडियाच्या प्रश्नाला ईमेल पाठवलेल्या उत्तरात सांगितले. यापूर्वी, सोशल मीडिया आणि काही परदेशी मीडिया संस्थांवर असा दावा केला जात होता की, भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये, किराना हिल्सना लक्ष्य करण्यात आले होते, जिथे पाकिस्तानची अण्वस्त्रे साठवली जातात.
हा खुलासा, भारतीय हवाई दलाच्या (IAF) आधीच्या विधानाशी सुसंगत आहे. सोमवारी, हवाई संचालन महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी स्पष्ट केले होते की, पाकिस्तानच्या किराणा टेकड्यांवर भारताने कोणतेही लक्ष्य भेदलेले नाही. या भागात काही अणु प्रकल्प असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. IAEA च्या या स्पष्टीकरणामुळे दोन्ही देशांमधील तणावाच्या काळात अणुआपत्तीच्या भीतीवर काही प्रमाणात विरजण पडले आहे.
लष्कराच्या वतीने सोमवारी (दि.१२) झालेल्या संयुक्त पत्रकार परीषदेत पाकिस्तानचे अणुस्थळ असलेल्या किराणा हिल्सवर भारताने हल्ला केला आहे का? असा सवाल केला गेला. त्यावर एअर मार्शल ए. के. भारती यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “किराणा हिल्समध्ये अणुस्थळ असल्याची माहिती तुम्ही दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. आम्हाला याबाबत माहिती नव्हती. आम्ही किराणा हिल्सला लक्ष्य केलेले नाही, तिथे जे काही आहे, ते आमच्या टारगेटमध्ये नव्हते.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख उपप्रवक्ते थॉमस पिगॉट यांना १३ मे रोजी वॉशिंग्टन डीसी येथे पत्रकार परिषदेत विचारण्यात आले की रेडिएशन गळतीच्या वृत्तानंतर अमेरिकेने पाकिस्तानला कोणतीही टीम पाठवली आहे का? पिगॉट यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला, "यावेळी मला याबद्दल काहीही म्हणायचे नाही." अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे स्वागत केले आणि दोन्ही देशांमध्ये थेट संवादाचे समर्थन केले.