

India's Foreign Minister S Jaishankar Bulletproof Car
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आणि भारत- पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन देशांमधील तणावपूर्ण परिस्थिती पाहता हा निर्णय घेतला असून जयशंकर यांना बुलेटप्रूफ कारही देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या निवासस्थानावरील सुरक्षेत वाढवण्यात आली आहे. जयशंकर यांना सुरूवातीला सीआरपीएफ कमांडोंकडून झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. यापूर्वी 2023 मध्ये त्यांना Y ऐवजी Z दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भारतीय संरक्षण दलांचे ऑपरेशन सिंदूर, त्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने सीमा रेषेवर सुरू केलेल्या कुरापती आणि ड्रोन हल्ले यामुळे भारत- पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आला असला तरी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे, असा सज्जड दमच भारताच्या डीजीएमओंनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांनी नुकताच देशातील महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतला. दहशतवादी हल्ल्याचा धोका असलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत यात निर्णय घेण्यात आला.
एस. जयशंकर यांच्यासाठी बुलेट प्रुफ कार
गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना बुलेटप्रुफ कार देण्यात आली असून निवासस्थानाबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. जयशंकर यांना आधीपासूनच झेड दर्जाची सुरक्षा आहे. सीआरपीएफचे 30 पेक्षा जास्त जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.
झेड प्लस सुरक्षा कोणाला?
झेड प्लस सुरक्षेत 22 सुरक्षा कर्मचारी आणि एनएसजीचे 4 ते 6 कमांडो तैनात असतात. याशिवाय स्थानिक पोलिस आणि एक बुलेट प्रुफ कारही दिली जाते.
सीआरपीएफ 210 अतिमहत्त्वाच्या सुरक्षेसाठी तैनात
सध्या देशभरातील 210 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. यात गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, दलाई लामा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचा समावेश आहे.