

cancer choriocarcinoma :
जम्मू: गर्भधारणेदरम्यान होणारा आणि महिलांमध्येही अत्यंत दुर्मिळ असणारा 'कोरिओकार्सिनोमा' हा कर्करोग प्रथमच एका २३ वर्षीय तरूणामध्ये आढळला आहे. ही घटना वैद्यकीय विज्ञानासाठी एक मोठे आव्हान ठरली आहे. सामान्यतः गर्भाशयातील भ्रूणाच्या ऊतींमधून विकसित होणारा हा कर्करोग पुरुषात सापडल्याने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
समीर आनंद (वय २३) असे या पीडित तरुणाचे नाव आहे. तो रिहाडी येथे राहत असून एका बांधकाम कंपनीत अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहे. सुरुवातीला त्याला फक्त पाठदुखीचा त्रास होता. ऑर्थोपेडिक सर्जनने कार्यालयीन कामामुळे दुखत असल्याचे सांगून औषधोपचार केले. मात्र, जेव्हा वेदना पोटाच्या खालच्या भागापर्यंत पसरल्या, तेव्हा समीरने अल्ट्रासाउंड तपासणी करून घेतली. या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली. त्याच्या यकृतामध्ये चौथ्या स्टेजचा कोरिओकार्सिनोमा कर्करोग आढळला.
हा कर्करोग प्रति एक लाख महिलांमध्ये केवळ ०.३ टक्क्यांपर्यंतच आढळतो. पुरुषांमध्ये याचे निदान होण्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे.
समीरवर जम्मू येथील राज्य कर्करोग संस्थेमध्ये वरिष्ठ मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राजीव गुप्ता यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉ. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरच्या रक्तातील बीटा एचसीजी या हार्मोनची पातळी सहा लाखांहून अधिक होती, जी या कर्करोगाची निश्चिती करते. पुरुषांमध्ये या कर्करोगाचे निदान होणे ही स्वतःच एक अभूतपूर्व घटना आहे.
"हा एक अत्यंत दुर्मिळ केस आहे आणि वैद्यकीय विज्ञानासाठी मोठे आव्हान आहे. या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी बीटा एचसीजी हार्मोनची पातळी शून्यावर आणणे हेच आमच्या उपचाराचे प्रमुख लक्ष्य आहे," असे डॉ. राजीव गुप्ता यांनी स्पष्ट केले.
समीरने सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि आता त्याची प्रकृती खूप सुधारली आहे. बीटा एचसीजी हार्मोनची पातळी शून्य होईपर्यंत त्याचे उपचार सुरू राहणार आहेत.