

PM Kisan 21st Instalment 2025: बिहार निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर केंद्र सरकार आता देशातील शेतकऱ्यांना गिफ्ट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम-किसान योजनेचा 21 वा हप्ता देणार असून, ही रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
पीएम-किसान ही 2019 पासून सुरू असलेली योजना असून, प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6,000 रुपये आर्थिक मदत मिळते. वर्षात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना 20 हप्त्यांमधून तब्बल 3.70 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची खरेदी करण्यास मोठी मदत झाली आहे.
काही राज्यांतील अहवालानुसार ही रक्कम घरगुती गरजा, शिक्षण, लग्नसमारंभ अशा खर्चांसाठीही उपयुक्त ठरली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीनविषयक माहिती पीएम-किसान पोर्टलवर देणे आणि शेतकऱ्याचे बँक अकाउंट आधारशी लिंक असणे बंधनकारक आहे.
आंतरराष्ट्रीय खाद्य व धोरण संशोधन संस्थेने 2019 मध्ये केलेल्या अभ्यासात पीएम-किसान योजनेमुळे ग्रामीण आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अभ्यासानुसार, नियमित आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांचे कर्जावरील अवलंबित्व कमी झाले असून, शेतीतील गुंतवणूक आणि उत्पादनक्षमता वाढण्यास मदत झाली आहे.
योजनेचा लाभ पात्रांपर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारने गाव पातळीवर विशेष मोहीम राबवली आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून कृषी मंत्रालयाने ‘किसान रजिस्ट्री’ तयार करण्याचा प्लॅन केला आहे.
या डिजिटल नोंदणीतून शेतकऱ्यांची माहिती अधिक अचूक आणि पारदर्शक पद्धतीने मिळेल. परिणामी, शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी वारंवार कागदपत्रे देण्याची गरज राहणार नाही आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ अधिक चांगल्या प्रकारे मिळेल.