

Shirol Banana farming loss
कवठेगुलंद : बुबनाळ (ता. शिरोळ) परिसरात अनेक शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात केळीची लागवड केलेली आहे. जगदीश कारदगे या शेतकऱ्याने तब्बल 2 एकर क्षेत्रात तीन हजार केळीच्या झाडांची लागवड केली होती. परंतु, मागील दोन महिन्यांपासून केळीचे दर कमालीचे घसरले आहेत. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याने त्यांनी आपल्या शेतातील दोन एकर क्षेत्रातील केळीच्या बागेवर रोटाव्हेटर फिरविला.
बुबनाळ येथील जगदीश कारदगे यांनी तब्बल 2 एकर क्षेत्रात तीन हजार झाडांची मागील ऑक्टोंबर महिन्यात लागवड केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून केळीचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली. परंतु, सध्या केळीला केवळ 3 ते 4 रुपये किलोचा भाव मिळत आहे. यातून लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे. दरवर्षी कारदगे यांना केळी लागवडीतून चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, यावर्षी अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.
कारदगे यांना केळी लागवडीसाठी तीन लाख खर्च आलेला आहे. मात्र, भाव घसरल्याने एक लाखांचे सुद्धा उत्पन्न येणार नाही. केळीला भाव नसल्यामुळे शेतकरी केळी तोडण्यास टाळाटाळ करत आहेत. केळी तोडण्यासाठी मजुरांना प्रत्येकी पाचशे रुपये मजुरी द्यावी लागते. तोडण्याची मजुरीदेखील निघत नाही. व्यापारी कमी दरात केळी खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्याने नैराश्यातून केळी पिकावर रोटाव्हेटर फिरविला.