

Rahul Gandhi
नवी दिल्ली: नीट पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्यांवर जलदगतीने खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी केंद्र सरकार 'फास्ट-ट्रॅक' न्यायालये स्थापन करेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मोदींच्या या घोषणेवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पेपरफुटीप्रकरणाला त्यांनी थेट मोदींना जबाबदार धरले आहे. "तुम्हीच आमच्या तरुणांच्या भविष्याचे सर्वाधिक नुकसान केले आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी म्हणाले की, "तुम्ही आमच्या शिक्षण व्यवस्थेवर पूर्ण ताबा मिळवण्यास आणि तिचा विध्वंस करण्यास केवळ परवानगीच दिली नाही तर प्रोत्साहनही दिले. त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिले."
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार करत तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. "१. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा. २. विद्यार्थ्यांची माफी मागा. ३. ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करा."
'एक्स' वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आपल्या तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. पेपर लीक प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिले आहेत. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांची ही मालिका अशीच सुरू राहील."
त्यांनी पुढे म्हटले की, "जे लोक आपल्या तरुणांच्या भविष्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, त्यांना सोडले जाणार नाही."
नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या गोंधळावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या निवासस्थानावर एक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. या आंदोलनादरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या देखील सहभागी झाल्या होत्या.