CJP Protest: जंतर-मंतरवर आंदोलकांचा तीव्र एल्गार, कडेकोट बंदोबस्त; दगडफेकीत २ एसीपींसह ४ पोलीस जखमी

नीट पेपर लीकप्रकरण आणि शिक्षणव्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीवरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन अधिकच आक्रमक झाले आहे.
CJP Protest
CJP Protestfile photo
Published on
Updated on

CJP Protest

नवी दिल्ली: नीट पेपर लीकप्रकरण आणि शिक्षणव्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीवरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन अधिकच आक्रमक झाले आहे. गुरुवारीही या ठिकाणी हजारो आंदोलकांनी गर्दी केली असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. यापूर्वी बुधवारी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला हिंसक वळण लागून झालेल्या दगडफेकीत दोन साहाय्यक पोलीस आयुक्त आणि इतर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने पश्चिम बंगालमधून सीआरपीएफच्या २० तुकड्या तातडीने दिल्लीत तैनात केल्या आहे.

बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास जंतर-मंतरवर आंदोलक आणि पोलिसांमध्ये पहिली चकमक उडाली. आंदोलकांनी पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या आणि दगडफेक केली. या हल्ल्यात पंजाबी बागचे एसीपी जयप्रकाश जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत आंदोलकांना पांगवले. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास एनडीएमसी चौक आणि टॉलस्टॉय मार्गावर आंदोलकांनी पुन्हा दगडफेक सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि 'आरएएफ'च्या जवानांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत लाठीचार्ज केला. या दुसऱ्या घटनेत एसीपी विवेक भगत यांच्यासह अन्य दोन पोलीस जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

CJP Protest
Shabana Azmi CJP|'अश्रुधुरामुळे दम्याचा झटका, इनहेलर होता म्हणून सावरले'; आंदोलनात सहभागी झालेल्या शबाना आझमी यांनी काय सांगितलं?

सरकारला इशारा आणि विरोधकांचा पाठिंबा

अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवर एक व्हिडिओ जारी करत सरकारला इशारा दिला आहे. "जंतर-मंतरवरील पोलीस बंदोबस्त पाहता सरकार आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. परंतु, सरकारने ही चूक करू नये. ही 'जेन-जी' पिढी आहे, ती कोणालाही घाबरणार नाही," असे केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, या आंदोलनाला आता राजकीय वळण मिळत असून बुधवारी सीपीएम नेत्या वृंदा करात, समाजवादी पक्षाचे अतुल प्रधान आणि मराठा आंदोलनाते नेते मनोज जरांगे पाटील यांनी जंतर-मंतरवर पोहोचून आंदोलकांना पाठिंबा दर्शवला. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकासह देशभरातून युवक आणि नागरिक येथे दाखल होत आहेत.

केंद्रीय मंत्र्यांच्या निवासावरील चर्चेचा प्रस्ताव फेटाळला

वाढता वाद शमवण्यासाठी पोलिसांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी हा प्रस्ताव स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. "आता जी काही चर्चा होईल, ती जंतर-मंतरवर किंवा इतर कोणत्याही तटस्थ ठिकाणीच होईल," अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा सीजेपीचे दुसरे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी दिला आहे.

सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

बुधवारी आंदोलकांची संख्या सुमारे ३० हजारांवर पोहोचली होती. आंदोलक संसद भवनाच्या दिशेने कूच करत असताना सुरक्षा दलांशी त्यांची मोठी झटापट झाली. खबरदारीचा उपाय म्हणून जनपथ आणि कनॉट प्लेससह परिसरातील १६ मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि निकास द्वार सकाळी १०:३० वाजता बंद करण्यात आले होते. सायंकाळी साडेसहा वाजता ही मेट्रो स्थानके पूर्ववत सुरू करण्यात आली. सध्या जंतर-मंतर, टॉलस्टॉय मार्ग आणि संसद मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले असून संपूर्ण परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे.

CJP Protest
CJP Protest Manoj Jarange : ‘तुम्ही ही जागा सोडली, तर सरकार आंदोलन मोडून काढेल!’ : मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
logo
Pudhari News
pudhari.news