

Parliament Monsoon Session 2025 Gaurav Gogoi on discussion on Operation sindoor in Loksabha
नवी दिल्ली ः लोकसभेतील ऑपरेशन सिंदूरवर सुरू असलेल्या चर्चेत सुरवातीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन केल्यानंतर काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी त्यांच्या भाषणातून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानी हल्ल्यांना नामोहरम करत नियंत्रण राखले असताना अचानक सीझफायर का केले गेले?
विरोधी पक्षांचा, जनतेचा सरकारला पाठिंबा असतानाही पाकव्याप्त काश्मीर घेण्याची संधी सरकारने का सोडली? असा सवाल खा. गोगोई यांनी केला. सरकारने सत्य सांगण्यास घाबरू नये. आम्ही सरकारसोबत आहोत, असेही ते म्हणाले.
खा. गोगोई म्हणाले की, राजनाथ सिंह यांनी हे सांगितले नाही की, पहलगाममध्ये दहशतवादी कसे, कुठून आले? बैसारणमध्ये पाच दहशतवादी कसे घुसले, त्यांचा हेतू काय होता? त्या दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पर्यटन उद्योगाला धक्का दिला.
देशभरातील पर्यटक जे तिथे होते त्यांनी जखमींना मदत केली. पहलगाम हल्ल्याला 100 दिवस झाले तरी हल्लेखोरांना सरकार का पकडू शकले नाही? त्यांना फरार होण्यास कुणी मदत केली? तुमच्याकडे सॅटेलाईट आहे, पेगॅसस आहे, ड्रोन आहे.
तरीही पकडू का शकले नाही. हल्ल्यानंतर दहशतवादी कुठे गेले? असे मुलभूत सवाल काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, गृहमंत्री काश्मीरमध्ये जाऊन म्हणत होते की, बंदोबस्त चांगला आहे. दहशतवाद्यांचा कणा मोडून काढला आहे. तरीही उरी, पुलवामा हल्ले झाले. या हल्ल्यांची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. काश्मीरच्या उपराज्यपालांच्या मागे सरकारने लपू नये.
परराष्ट्र धोरणाचे सत्य समोर आले पाहिजे. प्रसारमाध्यमांतून सरकार असे सांगत होते की, आता आपण मागे हटणार नाही. आता पाकिस्तानचे काही खरं नाही, असेच आम्हाला वाटत होते. आणि आम्ही सर्वजण सरकारसोबत होतो. सरकारच्या कारवाईला आमचे समर्थन होते. पाठिंबा होता. पण तरीही ऑपरेशन सिंदूर कारवाई सुरू असताना आपण मागे का हटलो?
पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान मोदी सौदी अरेबियामध्ये होते. ते भारतात आल्यावर त्यांनी तत्काळ पहलगामला जाणे आवश्यक होते. पण ते बिहारला गेले. तिथे निवडणूक प्रचाराचे भाषण केले. पहलगाममध्ये सर्वप्रथमजर कुणी गेले असेल तर राहुल गांधी गेले.
राजनाथ सिंह म्हणतात आमचा उद्देश युद्ध करणे नव्हता. का नव्हता? हे तर युद्धासाठी सबळ कारण होते. हाच उद्देश असायला हवा होता. पाकिस्तान व्याप्त काश्मीर घेण्याची ही संधी होती. आज नाही घेणार नाही तर कधी घेणार पाकव्याप्त काश्मीर? ऑपरेशन सिंदूर हीच चांगली संधी होती पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची.
उरी, पुलवामा वेळी सर्जिकल स्ट्राईक, एअस्ट्राईक आपण केला. तेव्हाही दहशतवाद्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चवर हल्ला केलाच होता की, पण तिकडून पुन्हा हल्ला झालाच.
गोगोई म्हणाले, आपल्याकडे 35 राफेल आहेत. त्यातील काही पडले असतील तर ती मोठी हानी आहे. काही टारगेटवर हल्ला करण्याचे निर्बंध होते त्यामुळे भारताने काही विमाने गमावल्याचे अधिकारी सांगताहेत. पूर्वी 21 टागरेट्स निश्चित्त केले होते. पण नंतर 9 टारगेट निश्चित्त केले गेले.
संपूर्ण देशाने पाकिस्तानवर कारवाईसाठी पंतप्रधान मोदींनी पूर्ण पाठिंबा असताना अचानक सीझफायर केले गेले. सीझफायर का करण्यात आला.? मोदी कुणासाठी थांबले? मोदी कुणासमोर झुकले?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 26 वेळा सांगितले की त्यांनी सीझफायर घडवून आणले. ते म्हणतात विमाने पडली. एक एक विमान कोट्यवधी रूपयांचे आहे. कोणत्या तोंडाने सांगता परराष्ट्र धोरण यशस्वी ठरले ?
खा. गोगोई म्हणाले, सरकारने सत्याला घाबरू नये. दहशतवादविरोधात विरोधी पक्ष सरकारसोबत आहेत. आम्ही सरकारचे शत्रू नाही. आम्ही सरकारच्या बाजूने आहोत. पण तुम्ही आम्हाला सत्य सांगितले पाहिजे. सत्य ऐकण्याचा आम्हाला अधिकार आहे.
तुम्ही भ्रम पसरवू नका. सत्य सांगा. आम्ही ते ऐकायला तयार आहोत. सत्य काहीही असो. आम्ही सरकारसोबत आहोत. पण सत्यच सांगा, भ्रम पसरवू नका. गृहमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जबाबदारी घेत आहेत का?