

Operation Mahadev in Jammu and Kashmir 3 terrorist killed including mastermind of Pahalgam terror attack Musa
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरजवळील लिडवास परिसरात भारतीय लष्कराने 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या या धडक कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले असून, हा पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधातील मोठा बदला मानला जात आहे. या कारवाईमुळे खोऱ्यातील दहशतवादी संघटनांना जबर हादरा बसला आहे.
लष्कराच्या या कारवाईत पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी मूसा याचाही खात्मा करण्यात आल्याचे समजते. आज सोमवारी (28 जुलै) संसदेत एकीकडे ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा खात्मा केल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्य दल पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत माहिती देणार असल्याचे समजते.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने 28 जुलै रोजी पहाटे लिडवास आणि दाचीगामच्या घनदाट जंगलात वेढा घातला. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली.
जवानांनी परिसराला वेढा घातल्यानंतर, लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही बाजूंमध्ये भीषण चकमक सुरू झाली. अनेक तास चाललेल्या या चकमकीत सुरक्षा दलांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत तीन दहशतवाद्यांना ठार केले.
सुरक्षा दलांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) शी संबंधित होते. हे दहशतवादी नुकत्याच झालेल्या पहिलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचा प्रबळ संशय आहे.
त्यामुळे 'ऑपरेशन महादेव' ही केवळ एक दहशतवादविरोधी कारवाई नसून, पहिलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.
भारतीय लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या समन्वयामुळे ऑपरेशन यशस्वी झाले. तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याने सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईमुळे लष्कर-ए-तोयबाची उपशाखा असलेल्या TRF संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या चकमक थांबली असली तरी, परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याच्या शक्यतेमुळे लष्कराची शोधमोहीम अद्यापही सुरू आहे. संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली जात असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकंदरीत, 'ऑपरेशन महादेव' हे जम्मू-काश्मीरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. या कारवाईमुळे खोऱ्यातील दहशतवादी कारवायांना मोठा धक्का बसला असून, सुरक्षा दलांचे मनोधैर्य उंचावले आहे.