

लखनौ : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचे आज (दि.११) उद्घाटन केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. यानंतर संरक्षणमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
लखनौमध्ये ब्रह्मोस उत्पादन युनिटचे उद्घाटन केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "ब्रह्मोस एकत्रीकरण आणि चाचणी केंद्राच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आज आपल्याशी संवाद साधताना मला आनंद होत आहे. मला प्रत्यक्ष उपस्थित राहायचं होतं. पण तुम्हाला माहिती आहे, मी का येऊ शकलो नाही. सध्याच्या परिस्थितीकडे पाहता मला दिल्लीत उपस्थित राहणं आवश्यक होतं. त्यामुळे मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुमच्याशी जोडलेलो आहे..."
लखनौमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचे उद्घाटन करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशला संरक्षण उत्पादनाचे केंद्र म्हणून गौरवले. ते पुढे म्हणाले की, "उत्तर प्रदेश भारताच्या संरक्षण कॉरिडॉरमध्ये एक प्रमुख घटक म्हणूनही ओळखले जाईल".
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "...भारत मातेच्या (काश्मीर) मुकुटावर हल्ला करणाऱ्या आणि अनेक कुटुंबांमधील 'सिंदूर' पुसून टाकणाऱ्या भारतविरोधी आणि दहशतवादी संघटनांना, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे न्याय मिळवून दिला. त्यामुळे संपूर्ण देश भारतीय सैन्याचे आभार मानत आहे. ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हे, तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचेही प्रतीक आहे. ही दहशतवादाविरोधातील कारवाई भारताच्या इच्छाशक्तीचे आणि लष्करी ताकदीचे दर्शन घडवते.
भारताने दाखवून दिले की, दहशतवादाविरोधात कारवाई करताना, भारत फक्त आपल्याच सीमांपुरता मर्यादित राहणार नाही, तर सीमापारसुद्धा दहशतवाद्यांना आणि त्यांच्या नेत्यांना सुरक्षित वाटणार नाही. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरु केले. आम्ही कधीच पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य केले नाही. पण पाकिस्तानने केवळ भारतातील नागरी क्षेत्रांवर हल्ला केला नाही, तर मंदिर, गुरुद्वारे आणि चर्च यांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
भारतीय सैन्याने शौर्य आणि संयम दाखवत पाकिस्तानातील इतर ठिकाणांना लक्ष्य करून सडेतोड प्रत्युत्तर दिले. आम्ही केवळ सीमेजवळील लष्करी तळच लक्ष्य केले नाहीत, तर भारतीय सैन्याच्या कारवायांचा आवाज रावळपिंडीपर्यंत ऐकू गेला, जिथे पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय आहे, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
राजनाथ सिंह म्हणाले, "उरी घटनेनंतर, भारतात दहशतवादी हल्ला केल्याचे परिणाम काय होतात, हे संपूर्ण जगाने पाहिले. जेव्हा आपल्या सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले. पुलवामा नंतरही जगाने पाहिले. जेव्हा बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक झाली. आता पहलगाम घटनेनंतर, भारत पाकिस्तानमध्ये घुसून अनेक ठिकाणी कारवाया करत आहे, हे जग बघत आहे".दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेच्या धोरणावर चालत, आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे की, हा 'नवा भारत' आहे जो सीमेनच्या दोन्ही बाजूंना दहशतवादाविरोधात प्रभावी पावले उचलेल. आपल्या पंतप्रधानांनी हे फार स्पष्टपणे सांगितले आहे."
लखनौ येथील ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीच्या उद्घाटन समारंभात, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १९९८ मध्ये पोखरण येथे झालेल्या ऐतिहासिक अणुचाचणीची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, या चाचणीने जगासमोर भारताची ताकद दाखवून दिली आणि ती शास्त्रज्ञ, अभियंते, संरक्षण कर्मचारी आणि इतर विविध भागधारकांच्या समर्पित प्रयत्नांचे परिणाम आहे.