

Operation Sindoor
पुढारी ऑनलाईन डेस्क : पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केला. भारताने बुधवारी 'ऑपरेशन सिंदूर'च्या द्वारे अनेक दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. या कारवाईत ३ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी असल्याचे वृत आहे. स्वतः पंतप्रधान मोदी या ऑपेरेशनवर जवळून लक्ष ठेवून होते.
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. बुधवारी (दि.७) रात्री १.३० वाजता बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली, मुझफ्फराबाद यासह नऊ ठिकाणी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हल्ले करण्यात आले. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, लष्कर आणि जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० आणि सुखोई-३० एमकेआय सारख्या प्रगत लढाऊ विमानांनी बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद भागांना लक्ष्य करत ती उद्ध्वस्त केली. हे भाग बऱ्याच काळापासून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे गड मानले जातात.
1. बहावलपुर,
2. मुरीदके,
3. गुलपुर,
4. भीमबर,
5. चक अमरू
6. बाग
7. कोटली,
8. सियालकोट
9. मुजफ्फराबाद
भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचेही विधान समोर आले आहे. पाक सैन्याने सांगितले की, ६ ठिकाणी २४ हल्ले करण्यात आले. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३३ जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रात्रभर ऑपरेशन 'सिंदूर'वर सतत लक्ष ठेवून होते. या कारवाईअंतर्गत एकूण ९ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आणि सर्व हल्ले पूर्णपणे यशस्वी झाले.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारताने हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तान खडबडून झाले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सर्व शाळा व महाविद्यालये बुधवारी (दि.७) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सकाळी १०:३० वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे.
भारताने सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी छावण्या उद्वस्त केल्या. या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियाच्या X प्लटफॉमवर 'भारत माता की जय' असे लिहत भारतीय जवानांचे मनोबल वाढवले.