

श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एनआयए (NIA) चौकशीत एक मोठा खुलासा समोर आला आहे. या तपासात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (TRF), आयएसआय (ISI) आणि पाकिस्तानी लष्कर यांचा हात असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA च्या प्राथमिक अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयए हा अहवाल लवकरच केंद्र सरकारपुढे सादर करणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर तपास यंत्रणेने जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे. एनआयए किंवा तपास संस्था विविध पैलूंचा तपास करत आहेत. एनआयएच्या तपासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचा हात होता, असे सूत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. एनआयएच्या अहवालानंतर गृह मंत्रालय दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
हल्लयापूर्वी दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन व्हॅलीची रेकी केली होती.
आयएसआयच्या (ISI) इशाऱ्यानंतर पाकिस्तान लष्कराच्या मुख्यालयात पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आला.
दहशतवाद्यांनी शस्त्र बेताब खोऱ्यात लपवली होती, ते ठिकाण हल्ला झालेल्या बैसरन ठिकाणापासून १० किमी लांब आहे.
या हल्ल्यात ओव्हर ग्राऊंड (OGW) वर्करचा देखील सहभाग असल्याचा उल्लेख. त्यांची यादी तयार कऱण्यात आली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता देखील अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
NIA अहवालात पाकिस्तान व्यप्त काश्मीरचा उल्लेख असून, दहशतवादी POK मधील हँडलरच्या संपर्कात असल्याचेही म्हटले आहे.
NIA अहवासात दोन मास्टरमाइंडचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये दहशतवादी हाशमी मूसा आणि अली भाई उर्फ तल्हा भाई याचा उल्लेख आहे.
हाशिम मूसा आणि तल्हा भाई हे पाकिस्तानचे नागरिक असून, हा हल्ला घडवण्यासाठी ते मागील अनेक दिवसांपासून हँडलरच्या संपर्कात होते. त्यांना पाकिस्तानातून निर्देश दिले जात होते.