

online gaming addiction
गाझियाबाद : ऑनलाईन गेमिंग व्यसनातून तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडली आहे. आईवलिडांनी ऑनलाईन गेम खेळण्यास विरोध केल्यानंतर तिघीनींही इमारतीच्या नवव्या मजल्यांवरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. तिघींना ऑनलाईन गेम्सचे प्रचंड व्यसन जडले होते आणि कुटुंबियांचा या गोष्टीला तीव्र विरोध होता, असे प्राथमिक पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
'एनडीटीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना लॉकडाउनच्या काळात पाखी, प्राची आणि विंशिका या तिघा बहिणींना ऑनलाईन गेम्सचे व्यसन जडले होते. त्या एका कोरियन 'टास्क-बेस्ड' गेमच्या आहारी गेल्या होत्या. या व्यसनामुळे त्या नियमित शाळेतही जात नव्हत्या. या तिन्ही बहिणींचे एकमेकींवर प्रचंड प्रेम होते. जेवण, शाळा आणि झोपण्यापर्यंत त्या एकत्र असत.
बुधवारी (दि. ४) पहाटे दोनच्या सुमारास गाझियाबादमधील 'भारत सिटी' या निवासी टाऊनशिपमधील ९ मजल्यावरुन पाखी (१२), प्राची (१४) आणि विंशिका (१६) यांनी उडी घेतली. पालकांनी गेम खेळण्यास मज्जाव केल्याने चिडलेल्या तिन्ही बहिणींनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृत मुलींचे वडील चेतन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुली गेल्या अनेक दिवसांपासून हा जीवघेणा ऑनलाइन गेम खेळत होत्या. पोलीस तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या तिघींमध्ये १४ वर्षांची मधली बहीण प्राची या गेमची 'लीडर' होती. तीच इतर दोघींना कमांड देत असे आणि त्या तिघीही प्रत्येक काम एकत्रच करायच्या. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून, त्यावर केवळ 'Mummy Papa Sorry' असे लिहिले आहे.
डीसीपी निमिष पाटील आणि एसीपी अतुल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी मुलींचे मोबाईल फोन जप्त केले असून, त्यांना हा गेम खेळण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या त्या अज्ञात 'कंट्रोलर' किंवा लिंकचा शोध घेतला जात आहे. या आत्महत्येमागे केवळ गेमिंगचा विरोध होता की अन्य काही कारणे आहेत, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.