

उत्तर प्रदेशातील 13 वर्षांच्या एका मुलाला ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले होते. या गेमच्या नादात वडिलांच्या खात्यातील सुमारे 13 लाख रुपये या मुलाने गमावले. वडिलांनी ही रक्कम शेत विकून साठवली होती. सत्य उघडकीस आल्यानंतर भीतीने आणि अपराधगंडाने ग्रासलेल्या त्या मुलाने आत्महत्या केली. एका क्षणात कुटुंब उद्ध्वस्त झालं. या घटनेने सर्वच पालक हादरून गेले आहेत.
शहाजी शिंदे, संगणक प्रणालीतज्ज्ञ
आजच्या काळात तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. इंटरनेट, स्मार्ट फोन, संगणक आणि विविध डिजिटल साधनांनी मुलं व तरुणाईच्या जगात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत; पण या तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या विस्तारामुळे जितके फायदे झाले आहेत तितकेच गंभीर धोकेही निर्माण झाले आहेत. विशेषतः बालक, किशोरवयीन यांच्या जीवनावर इंटरनेटचे गंभीर परिणाम होत असून ते बहुआयामी आणि काही प्रमाणात घातकही आहेत. लखनौमध्ये नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेने या धोक्याचं वास्तव पुन्हा एकदा समाजासमोर ठळकपणे आणलं आहे. उत्तर प्रदेशातील 13 वर्षांच्या एका मुलाला ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले होते. याच्या नादात वडिलांच्या खात्यातील 13 लाख रुपये या मुलाने गमावले. वडिलांनी ही रक्कम शेत विकून साठवली होती. सत्य उघडकीस आल्यानंतर भीतीने ग्रासलेल्या त्या मुलाने आत्महत्या केली. एका क्षणात कुटुंब उद्ध्वस्त झालं. या घटनेने सर्वच पालक हादरून गेले आहेत.
पालक अनेकदा समजतात की, मुलं मोबाईल किंवा संगणकात गुंतली आहेत म्हणजे ती हुशार, टेक्नोफ्रेंडली आहेत; पण डिजिटल जगातलं अतिरेकाचं आकर्षण त्यांच्या मानसिकतेवर घातक परिणाम घडवून आणतं. अभ्यासातला रस कमी होतो, खेळाच्या मैदानापासून आणि सामाजिक नात्यांपासून ते दूर जातात. गेम्समधील आभासी जग त्यांना अधिक खरे वाटू लागते. कोवळ्या आणि अडनीड वयात या मोहातून बाहेर पडणं फार कठीण ठरतं. ऑनलाईन गेम्समध्ये पैसे लावून जिंकण्याचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे हे व्यसन हळूहळू जुगाराच्या स्वरूपात परावर्तित होतं. ‘फ्री फायर’सारख्या अनेक गेम्समध्ये पैसे गमावल्याचे असंख्य प्रकार समोर आले आहेत. मुलांच्या हातात जेव्हा घरच्या बँक खात्यांची माहिती किंवा डिजिटल पेमेंटचे पर्याय येतात, तेव्हा ते या आभासी खेळात सर्वस्व गमावतात. गेमिंगच्या व्यसनामुळे किंवा अतिवापरामुळे प्रत्येक मुलाच्या वर्तनात बदल हळूहळू दिसतो; पण व्यस्ततेमुळे किंवा उदासिनतेमुळे पालक त्याकडे दुर्लक्ष करतात.
मोबाईलवर किती वेळ घालवला जातो, कोणते गेम्स खेळले जातात, मुलांच्या स्वभावात एकाकीपणा, चिडचिडेपणा किंवा असामान्य वर्तन वाढतंय का, याकडे लक्ष दिलं जात नाही. जेव्हा घटना हाताबाहेर जाते तेव्हा पालकांना धक्का बसतो. मुलांना वेळ देणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना खेळ, वाचन आणि मित्रपरिवारासोबत गुंतवणं आवश्यक आहे; पण बहुतेकदा पालक स्वतःही मोबाईलच्या व्यसनात गुरफटलेले असतात. त्यामुळे मुलांसमोर चुकीचा आदर्श उभा राहतो.
ही समस्या केवळ वैयक्तिक पातळीवर न पाहता सामाजिक व शासकीय पातळीवरही हाताळायला हवी. दुर्दैवाने आपल्या देशात ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीत पुरेशी कडक धोरणं अस्तित्वात नाहीत. अशा गेम्सला जुगारासारखं मानून बंदी किंवा कठोर निर्बंध लावले गेलेले नाहीत. त्यामुळे गेमिंग कंपन्या मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध सापळे रचतात. सरकारने या खेळांवर कठोर नियंत्रण ठेवणं, वयोमर्यादा लागू करणं, आर्थिक व्यवहारांवर बंधनं घालणं आणि पालकांना सूचना देणं, हे आवश्यक आहे.