

Nuh Gang-Rape Case Haryana: हरियाणा राज्यातील नूंह जिल्ह्यात एक अत्यंत लज्जास्पद घटना घडली आहे. तावडू शहर पोलीस ठाण्यात एसआयआर (SIR) फॉर्म भरण्यासाठी आलेल्या एका विधवा महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडितेने पोलिसात तक्रार केल्यानंतर चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पीडितेने चार आरोपींची नावे सांगितली आहेत. या चार जणांना पोलिसांनी आरोपी केलं आहे. पीडितेने या आरोपींविरूद्ध गंभीर आरोप केले आहेत. तक्रार मिळताच तावडू शहर पोलीसांनी संबंधित कलमे लावून एफआयआर दाखल केली आहे. पोलीस आता सर्व आरोपींची या घटनेतील भूमिका आणि तथ्य याचा तपास करत आहेत.
तावडू शहर पोलीस ठाणे प्रभारी चंद्रभान यांनी सांगितलं की हे प्रकरण खूप गंभीर आहे. त्यामुळं पोलीस प्रत्येक कंगोऱ्याचा कसून तपास करत आहे. सर्व पुरावे गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. तपासाच्या आधारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी पोलीस कोणलाही सोडणार नाही.
पोलीस सध्या पीडित महिलेचा जबाब, घटनास्थळ आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते तपास पूर्ण झाल्यावर या प्रकरणी आवश्यक कारवाई करणार आहेत. मात्र या घटनेमुळं महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवून नका आणि तपास पूर्ण होईपर्यंत अधिकृत माहितीवरच विश्वास करा अशी विनंती केली आहे.