

Netflix job requirements
मुंबई: दिवसभर आवडीचे चित्रपट किंवा वेब सीरिज पाहायच्या आणि त्या बदल्यात तब्बल करोडोंचे सॅलरी पॅकेज मिळवायचे... ऐकायला थोडे आश्चर्यकारक वाटले तरी मनोरंजन विश्वात हे खरोखरच शक्य आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म 'नेटफ्लिक्स' कडून सध्या अशाच विशेष पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या नोकरीमध्ये केवळ मनोरंजन करणे एवढाच उद्देश नसून, कंटेंटचे विश्लेषण करणे आणि ते प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्याची जबाबदारी उमेदवारांवर असणार आहे.
नेटफ्लिक्सच्या अधिकृत करिअर वेबसाईटनुसार, 'अॅनालिस्ट, कंटेंट अँड प्रॉडक्शन क्लिअरन्स, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी' या पदासाठी वार्षिक १ लाख ६० हजार ते २ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्स एवढे वेतन निश्चित करण्यात आले आहे. भारतीय रुपयात ही रक्कम सुमारे १.४ कोटी ते २.१ कोटी रुपये वार्षिक इतकी होते. ही वेतनश्रेणी अमेरिकेतील पदांसाठी लागू असून अनुभव आणि आव्हानानुसार यात बदल होऊ शकतो.
दुसरीकडे, भारतातील पदांचा विचार केल्यास 'लँग्वेज प्रोड्युसर' पदासाठी वर्षाला ६ ते ७ लाख रुपये, तर 'स्क्रीनिंग स्पेशलिस्ट, एपीएसी' पदासाठी वार्षिक ५ ते ९ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज दिले जाऊ शकते.
या पदावर निवड झालेल्या कर्मचाऱ्याला नेटफ्लिक्सच्या चित्रपट आणि टीव्ही प्रॉडक्शनशी संबंधित कायदेशीर बाबी आणि जोखीम व्यवस्थापनाचे काम पाहावे लागेल.
चित्रपट आणि सीरिजच्या स्क्रिप्टची पडताळणी करणे.
निर्मितीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या वस्तू, कपडे, फोटो आणि प्रॉप्समुळे कॉपीराइट किंवा ट्रेडमार्कचे उल्लंघन होत नाही ना, हे तपासणे.
आवश्यक तेथे कायदेशीर मंजुरी मिळवणे.
निर्माते, लेखक आणि इतर टीमसोबत एकत्र काम करून निर्मितीशी संबंधित कागदपत्रे आणि परवानग्या व्यवस्थित ठेवणे.
उमेदवाराकडे चित्रपट किंवा टीव्ही प्रॉडक्शनशी संबंधित कायदेशीर बाबींचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. 'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स' (IPR), 'पर्सनॅलिटी राइट्स' आणि 'फेअर युज' यांसारख्या विषयांची सखोल माहिती असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. करारांची वाटाघाटी करणे, बारकावे टिपणे, वेगवेगळ्या टीमसोबत समन्वय साधणे आणि जलद निर्णय घेण्याची क्षमता उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.