

Neet Paper Leak
मुंबई: नीट परीक्षेचा फुटलेला पेपर देशातील तब्बल ५ राज्यांमध्ये विकला गेला होता. धक्कादायक बाब म्हणजे या पेपरची सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत आणि त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल गॅजेट्सच्या (मोबाईल, लॅपटॉप इ.) तांत्रिक तपासणीनंतर हा धक्कादायक खुलासा झाला आहे. हा पेपर नेमका किती विद्यार्थ्यांनी विकत घेतला होता आणि यासाठी किती कोटींचा व्यवहार झाला, याचा शोध आता चौकशी यंत्रणा घेत आहेत.
नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती हळूहळू वाढत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्याकडून लीक झालेली प्रश्नपत्रिका आपल्या मुलासाठी खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या संशयाच्या आधारे त्यांची सखोल चौकशी करण्यात आली.
सीबीआयने डॉ. शिरुरे यांना चौकशीसाठी लातूरहून पुण्यात आणले होते. त्यांच्याकडे पेपरफुटीच्या अनुषंगाने कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिरुरे यांना अटक करण्यात आली की नाही, याबाबत मात्र अधिकृत दुजोरा अद्यापपर्यंत मिळालेला नाही.
अंबाजोगाई शहरातील बहीण-भावाची सीबीआयने चौकशी केली असून, त्यांच्याकडून मोबाईल, सीम कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बहीण-भावाची आई शिक्षिका असून, त्यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नीट पेपरफुटी प्रकरणात पहिल्यांदा अटक करण्यात आलेला नाशिकचा शुभम खैरनार याच्यासह प्रा. मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे या तिघांना समोरासमोर बसवून सीबीआय त्यांच्याकडे चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पेपरफुटीमुळे रद्द झालेली नीट परीक्षा २१ जून रोजी पुन्हा होणार असल्याचे राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) जाहीर केले आहे. दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ दरम्यान पेपर होणार असल्याचे एनटीएने सांगितले आहे. विद्यार्थ्यांना १५ मे ते २१ मे २०२६ पर्यंत परीक्षा केंद्र निवडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. ज्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला नाही, त्यांच्यासाठी त्यांनी यापूर्वी निवडलेले शहरच कायम ठेवले जाईल. तर २१ मे २०२६ नंतर कोणत्याही बदलासाठी आलेल्या विनंत्यांचा विचार केला जाणार नसल्याचे एनटीएने स्पष्ट केले होते. तसेच या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा शहराची माहिती, प्रवेशपत्र आणि इतर तपशीलांची घोषणा नंतर अधिकृत संकेतस्थळावर केली जाईल; ही माहिती १४ जूनपर्यंत उपलब्ध होईल.