

NEET Paper Leak: देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा मानल्या जाणाऱ्या NEET परीक्षेबाबत मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पेपर लीकच्या आरोपांनंतर अखेर NEET परीक्षा रद्द करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता CBI कडे सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील जवळपास 22 लाख विद्यार्थी चिंतेत आहेत.
राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या (SOG) प्राथमिक तपासात असे संकेत मिळाले आहेत की, परीक्षेपूर्वीच जवळपास 600 गुणांपर्यंतचे प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले होते. धक्कादायक बाब म्हणजे केवळ प्रश्नच नाही, तर अनेक प्रश्नांचे पर्याय (Options) देखील मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
तपास यंत्रणांच्या सूत्रांनुसार, सुरुवातीला प्रश्नसंच (Question Bank) तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत विकले जात होते. मात्र, परीक्षा जवळ येत गेल्यानंतर त्याची किंमत कमी होत गेली आणि परीक्षेच्या आदल्या रात्री तोच पेपर 30 हजार रुपयांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
तपासात काही मोबाईल फोनमध्ये संबंधित दस्तावेज सापडले असून त्यावर ‘Forwarded Many Times’ असा टॅग दिसून आला आहे. यावरून हा मजकूर मोठ्या प्रमाणात शेअर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात राजस्थानमधील सीकर जिल्हा तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कथित प्रश्नसंचाचा धागा चुरू जिल्ह्यातील एका तरुणाशी जोडला गेला आहे. हा तरुण सध्या केरळमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चं शिक्षण घेत असल्याचं सांगितलं जात आहे.
असंही समोर आलं आहे की, 1 मे रोजी या तरुणाने ही माहिती सीकरमधील आपल्या मित्राला पाठवला होता. त्यानंतर ती वेगाने अनेक लोकांपर्यंत पोहोचली. काही रिपोर्ट्सनुसार, एका PG संचालकाकडेही पेपरची माहिती पोहोचली होती आणि तिथूनच ती विद्यार्थ्यांमध्ये आणि करिअर काउंसलर्समध्ये व्हायरल झाली.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रश्न जुळण्याचा दावा. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या कथित प्रश्नसंचामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे 300 पेक्षा अधिक प्रश्न होते.
त्यापैकी सुमारे 140 प्रश्न मूळ NEET परीक्षेत जसेच्या तसे विचारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. NEET मध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात. त्यामुळे जवळपास 600 गुणांचे प्रश्न आधीच उपलब्ध होते, या दाव्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, एखाद्या ‘गेस पेपर’मधील काही प्रश्न जुळणं सामान्य असू शकतं. पण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न जुळणं अत्यंत गंभीर आहे.
तपासात हेही उघड झालं की, कथित पेपर फक्त WhatsApp पुरता मर्यादित नव्हता. अनेक एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप्सच्या माध्यमातूनही हा पेपर शेअर करण्यात आल्याचा संशय आहे.
तपास यंत्रणा आता सोशल मीडिया चॅट्स, कॉल डिटेल्स आणि विविध मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील लिंक तपासत आहे. काही ठिकाणी या प्रश्नसंचाचे प्रिंटआउट काढून ऑफलाइन पद्धतीनेही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात सीकरमधील एका PG संचालकाचं नावही समोर आलं आहे. विशेष म्हणजे, परीक्षा संपल्यानंतर त्याच व्यक्तीने NTA आणि पोलिसांकडे तक्रार करत विद्यार्थ्यांकडे संशयास्पद प्रश्नसंच पोहोचल्याचा दावा केला होता.
मात्र, तपासात उघड झालं की त्यालाही हा पेपर आधीच मिळाला होता आणि त्याने तो इतरांना फॉरवर्ड केल्याचा संशय आहे. त्यामुळे तपास यंत्रणा आता त्याचीही सखोल चौकशी करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, NEET पेपर लीक प्रकरणातील पहिला मोठा धागा नाशिकशी जोडला जात आहे. कथित प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी इथे तयार करण्यात आली आणि नंतर ती हरियाणात पाठवण्यात आल्याचा संशय आहे.
हरियाणात या पेपरचे 10 वेगवेगळे सेट तयार करण्यात आले आणि त्यानंतर ते विविध राज्यांमध्ये पसरल्याचा दावा केला जात आहे. तपास यंत्रणा आता या संपूर्ण नेटवर्कमागील लोकांचा शोध घेत आहेत.
आतापर्यंतच्या तपासात जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष हा या संपूर्ण प्रकरणाचा कथित सूत्रधार किंवा मास्टरमाइंड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
माहितीनुसार, मनीषने परीक्षा प्रश्नपत्रिका अधिकृतपणे छापण्यापूर्वीच संभाव्य प्रश्न मिळवले होते. हे प्रश्न नंतर विविध माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवण्यात आले असावेत, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
NEET परीक्षा घोटाळ्याची गंभीरता लक्षात घेता, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आली आहे.
3 मे रोजी झालेल्या NEET परीक्षेत पेपर लीक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या परीक्षेला देशभरातून 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. अखेर वाद वाढल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली.
NTA च्या शिफारशीनंतर CBI आता या प्रकरणात अधिकृतपणे तपास सुरू करणार असून, मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (SOG) 11 मे रोजी तब्बल 45 जणांची चौकशी केली होती. यापैकी निम्म्याहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
सध्या राजस्थान SOG च्या ताब्यात असलेल्या 13 जणांची CBI चौकशी करणार असल्याचं समोर आलं आहे. CBI तपास सुरू झाल्यानंतर या संशयितांना केंद्रीय यंत्रणेकडे सुपूर्द केलं जाऊ शकतं.
या संपूर्ण प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांची मेहनत घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याने मानसिक ताण वाढला आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असून, पेपर लीक नेटवर्क किती मोठं आहे आणि त्यामागे नेमकं कोण आहे, हे CBI च्या तपासातून स्पष्ट होणार आहे.
NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. लाखो विद्यार्थी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर ही परीक्षा देतात. आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण आणि अनिश्चितता वाढली आहे.
मात्र, NTA ने स्पष्ट केलं आहे की विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. नवीन परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तरीही, या प्रकरणामुळे देशातील शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर आणि परीक्षेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.