

Shivraj Motegaonkar Neet Paper Leak Case Update
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणात सोमवारी नवी माहिती समोर आली. 'रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस'चे संस्थापक शिवराज रघुनाथ मोटेगावकरचा मुलगा बारावीला असल्याचे समजते. त्याने मुलासाठीच पेपर फोडला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मोटेगावकरच्या वैयक्तिक मोबाईल फोनमध्ये 3 मे रोजी झालेल्या परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका आढळून आली. या पेपरफुटीमध्ये आणि पेपर अनेकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये सहभागी असलेल्या संघटित टोळीचा तो एक सक्रिय सदस्य होता; तसेच आपल्या कोचिंग सेंटरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आणि उत्तरे पुरवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्यामार्फतच नीटची प्रश्नपत्रिका मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली.
परीक्षेच्या 10 दिवस आधीच प्रश्नपत्रिका मोटेगावकरकडे
परीक्षेच्या सुमारे 10 दिवस आधी, म्हणजेच 23 एप्रिल रोजी त्याला प्रश्नपत्रिका आणि उत्तरे प्राप्त झाली होती. त्याने या फुटलेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या प्रती अनेकांना हस्तलिखित नोट्सच्या स्वरूपात पुरवल्या होत्या. परीक्षा संपल्यानंतर या सर्व प्रती नष्ट करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार असलेल्या प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी हा मोटेगावकरचा निकटवर्तीय असल्याचे समजते.
सीबीआयने यापूर्वीच रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे या दोघांना अटक केली होती. या दोघांची एकमेकांशी ओळख मनीषा वाघमारे या महिलेमार्फत झाली होती; मनीषा वाघमारे ही देखील सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे.
सुनावणीदरम्यान, मोटेगावकर याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, त्यांच्या अशिलाला पोलीस कोठडीत ठेवण्याची काहीही आवश्यकता नाही; कारण ते १९९९ पासून अध्यापनाचे कार्य करत आहेत आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व आवश्यक साहित्य यापूर्वीच जप्त करण्यात आले आहे.
शिवराज मोटेगावकर याने पेपर आपल्या मुलासाठी फोडला?
शिवराज मोटेगावकर याचा मुलगा बारावीला असल्याचे समजते. यामुळे त्याने मुलासाठी पेपर फोडला असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवराजने या प्रकरणातील आरोपी आणि प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याच्याकडून पेपर घेतला. त्याचे पुरावे मोटेगावकर याच्या मोबाईलमधे सीबीआयला सापडले, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी 'रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस'चे संस्थापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर याला नऊ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले. केंद्रीय तपास यंत्रणेने आरोपीच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केल्यानंतर, विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी आरोपीची नऊ दिवस कोठडीत चौकशी करण्यास परवानगी दिली.