NEET Paper Leak: ट्युशन घेणारा शिक्षक ते 100 कोटींचं कोचिंग साम्राज्य; CBIने अटक केलेला शिवराज मोटेगावकर कोण आहे?

Who Is Shivraj Motegaonkar: लातूरमधील RCC कोचिंग संस्थेचे संस्थापक शिवराज मोटेगावकर हे एकेकाळी सायकलवरून घराघरांत जाऊन ट्युशन शिकवणारे शिक्षक होते.
Who Is Shivraj Motegaonkar
Who Is Shivraj MotegaonkarPudhari
Published on
Updated on

Who Is Shivraj Motegaonkar: देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना CBIने ताब्यात घेतल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे शिवराज मोटेगावकर कोण आहे? एकेकाळी सायकलवरून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवणारा शिक्षक आज महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोचिंग ब्रँडचा मालक कसा बनला? आणि आज त्यांचं नाव देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक घोटाळ्यात कसं आलं?

लातूरच्या शिक्षण क्षेत्रात ‘एम सर’ म्हणून ओळखले जाणारे शिवराज मोटेगावकर हे गेल्या दोन दशकांपासून मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांच्या कोचिंग क्षेत्रात मोठं नाव मानलं जात होतं. विशेषतः NEET, JEE आणि CET परीक्षांच्या तयारीसाठी त्यांचं RCC म्हणजेच रेणुकाई करिअर सेंटर हे महाराष्ट्रात एक प्रसिद्ध नाव बनलं.

छोटी सुरुवात, मोठी स्वप्न

शिवराज मोटेगावकर यांचा जन्म लातूरमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पण शिक्षणाची ओढ होती. त्यांनी केमिस्ट्री विषयात एमएस्सी केलं आणि त्यात गोल्ड मेडलही मिळवलं, असा दावा त्यांच्या संस्थेच्या अधिकृत माहितीमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय SET/NET-JRF, DRDO, GATE, BARC आणि TIFR सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा त्यांनी पात्र केल्याचंही सांगितलं जातं.

आज ज्या व्यक्तीकडे कोट्यवधींचा कोचिंग व्यवसाय आहे, त्याच शिवराज मोटेगावकरांनी आपल्या करिअरची सुरुवात घराघरांत जाऊन ट्युशन शिकवण्यापासून केली होती. सायकलवरून लातूरच्या गल्लीबोळात फिरत ते विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विज्ञान विषय शिकवत असत. त्या काळात ना मोठं ऑफिस होतं, ना मोठी टीम. फक्त शिकवण्याची आवड आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती.

भाड्याच्या खोलीतून सुरू झालं RCC

1999 मध्ये शिवराज मोटेगावकर यांनी अवघ्या दहा विद्यार्थ्यांसह एका भाड्याच्या खोलीत कोचिंग क्लास सुरू केला. सुरुवातीला ते फक्त केमिस्ट्री शिकवत असत. 11 वी, 12 वी आणि मेडिकल-इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांचा भर होता.

हळूहळू त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीची चर्चा सुरू झाली. केमिस्ट्रीसारखा कठीण विषय सोप्या भाषेत समजावून सांगणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. याच काळात ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा राज्यभर सुरू झाली होती आणि मोटेगावकर यांचं नावही त्यासोबत जोडलं जाऊ लागलं.

RCC मोठा ब्रँड कसं बनलं?

रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस म्हणून सुरू झालेला प्रवास पुढे RCC म्हणजे रेणुकाई करिअर सेंटर म्हणून विस्तारला. लातूरमधून सुरू झालेल्या या संस्थेने पुढे पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर आणि कोल्हापूरपर्यंत विस्तार केला.

सध्या RCCमध्ये 40 हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत असल्याचं सांगितलं जातं. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या कोचिंगमध्ये RCC हे महाराष्ट्रातील एक मोठं नाव बनलं.

स्थानिक पातळीवर तर RCCला लातूरच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत आधार मानलं जाऊ लागलं. संस्थेची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचंही बोललं जातं.

‘एम सर’ म्हणून लोकप्रिय

विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये शिवराज मोटेगावकर ‘एम सर’ या नावाने ओळखले जातात. अनेक विद्यार्थ्यांसाठी ते केवळ शिक्षक नव्हते, तर करिअर घडवणारे मार्गदर्शक मानले जात होते.

त्यांच्या संस्थेच्या माहितीनुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना चालवल्या जात होत्या. हजारो विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

Who Is Shivraj Motegaonkar
Maharashtra Election: विधान परिषद निवडणुकांची घोषणा; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदान

आणि मग अचानक CBIची एंट्री...

मात्र, गेल्या काही दिवसांत NEET पेपरफुटी प्रकरणात त्यांचं नाव समोर आल्यानंतर संपूर्ण चित्र बदललं. RCCचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांना मॉक टेस्टमधील किती प्रश्न NEET परीक्षेत आले, असं विचारताना दिसत होते.

तपासात केमिस्ट्री विषयातील काही प्रश्न मॉक टेस्ट आणि NEETमध्ये मिळतेजुळते असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर CBIने तपासाची दिशा लातूरकडे वळवली. यानंतर चौकशी, झडती आणि डिजिटल पुराव्यांच्या तपासानंतर CBIने शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news