

Jay Pawar for Rajya Sabha seat in Maharashtra
नवी दिल्ली : दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्या जागी राज्यसभेवर कोण जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेवर पार्थ पवार यांना पाठवण्यास भाजपचा विरोध असल्याचे वृत्त असून त्यांच्याऐवजी जय पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजप अनुकूल असल्याचे सूत्रांकडून समजते.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांना आता सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य व्हावे लागणार आहे. त्या विधानसभेसाठी पोटनिवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. राज्यात मंत्रिमंडळात जबाबदारी स्वीकारल्याने सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. या रिक्त जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता होती.
'पुढारी न्यूज'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थ पवार यांच्या नावाला भाजपने विरोध दर्शवला आहे. पुण्यातील जमीन व्यवहाराप्रकरणी पार्थ पवार अडचणीत आले असून सध्या या व्यवहाराची चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत पार्थ पवारांऐवजी जय पवारांना राज्यसभेवर पाठवावे, असे भाजपचे मत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोणाचा विरोध आहे म्हणून आम्ही कुठले निर्णय घेत नाही. आमच्या पक्षातील नेते काय म्हणतात त्यावर आम्ही निर्णय घेऊ.
सूरज चव्हाण, नेते, राष्ट्रवादी- अजित पवार गट
कोण आहेत जय पवार?
जय पवार हे अजित पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. ते 2019 पर्यंत राजकारणात सक्रीय नव्हते. ते दुबईत व्यवसाय- उद्योग सांभाळण्यास प्राधान्य द्यायचे. मात्र, 2019 मध्ये पार्थ पवारांचा पराभव, 2023 मध्ये राष्ट्रवादीत पडलेली फूट या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन- तीन वर्षांपासून ते राजकारणात काहीसे सक्रीय झाल्याचे स्थानिक सांगतात. दिवंगत अजित पवारांनी 2024 मध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर जय पवार यांना बारामतीच्या राजकारणात आणले जाईल, असे सूचक विधान केले होते.
जय पवार यांनी व्यवसाय व्यवस्थापन या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. मृदुभाषी जय पवार हे अजितदादांसारखेच झटपट निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. डिसेंबर 2025 मध्ये जय पवार यांनी ऋतुजा पाटील यांच्याशी विवाह केला. ऋतुजा पाटील यांनी अमेरिकेत बॅचलर ऑफ डिझाईनचे शिक्षण घेतले आहे. त्या काही काळ एका पीआर कंपनीत कार्यरत होत्या. यानंतर त्या वडील प्रवीण पाटील यांच्या ElevateEdge या सल्लागार समुहात रुजू झाल्या.